राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपा वर्चस्व राखणार की काँग्रेस बाजी मारणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 10:55 IST2019-05-23T08:35:18+5:302019-05-23T10:55:04+5:30
Rajasthan Lok Sabha Election Results Live Vote Counting:

राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपा वर्चस्व राखणार की काँग्रेस बाजी मारणार?
जयपूर: गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थान पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहिलं होतं. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 25 जागा भाजपाने खिशात घातल्या होत्या. यंदा त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राजस्थानात जवळपास 3 टक्के अधिक मतदान झालं. ही वाढलेली मतं नेमकी कोणाला साथ देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपाला चांगलं यश मिळेल असा अंदाज वर्तवला. त्यामुळे भाजपला राजस्थानकडून मोठ्या आशा आहेत. तर अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याने काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपच्या तुलनेत अवघा अर्धा टक्का अधिक मतदान झालं. मात्र त्यामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मोदी तुझसे बैर नही, वसुंधरा तेरी खैर नही ही घोषणा प्रचंड गाजली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाला हात दाखवणारी जनता लोकसभा निवडणुकीत मोदींना साथ देणार का याबद्दल उत्सुकता आहे.