अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर, औषधोपचारांना देताहेत प्रतिसाद - एम्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:05 IST2018-06-12T09:16:18+5:302018-06-12T13:05:22+5:30

एम्स हॉस्पिटल प्रशासनाकडून मंगळवारी (12 जून) जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी औषधोपचारांना प्रतिसाद देत आहेत.

Live Updates : Atal Bihari Vajpayee aiims medical bulletin delhi bjp | अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर, औषधोपचारांना देताहेत प्रतिसाद - एम्स

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर, औषधोपचारांना देताहेत प्रतिसाद - एम्स

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मूत्रसंसर्ग आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांना डायलेसिसवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  एम्स हॉस्पिटल प्रशासनाकडून मंगळवारी (12 जून) जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी औषधोपचारांना प्रतिसाद देत आहेत. मात्र संपूर्ण उपचार होईपर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.  दरम्यान, दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी देशभरात पूजा-प्रार्थना, हवन करण्यात येत आहेत.   


सोमवारी हॉस्पिटलमध्ये केले दाखल 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (11 जून) अटलबिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अंगात ताप नसून त्यांना डायलेसिसवर ठेवण्यात आले होते. वाजपेयी यांना रुटिन चेकअपसाठी दाखल केले असून रात्री घरी पाठवण्यात येईल, असे आधी सांगण्यात आले. मात्र नंतर त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांचे वय 93 असून, ते स्मृतिभ्रंश, मधुमेहामुळे अनेक वर्ष अंथरुणाला खिळून आहेत. ते सध्या कोणाला ओळखूही शकत नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली भेट

वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवानी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सध्या वाजपेयी यांना भेटण्याची कोणालाही मुभा नाही. 



 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 मिनिटं होते हॉस्पिटलमध्ये
अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स हॉस्पिटलमध्ये सोमवारी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोदींनी डॉक्टरांची भेट  घेऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. यादरम्यान मोदी यांनी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांसोबतही बातचित केली. जवळपास 50 मिनिटं ते हॉस्पिटलमध्ये थांबले होते. 

Web Title: Live Updates : Atal Bihari Vajpayee aiims medical bulletin delhi bjp