मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:46 IST2025-08-09T18:46:07+5:302025-08-09T18:46:47+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील कानपूर येथी तुरुंगात एक अजब घटना घडली आहे. येथील तुरुंगामधून एक कैदी अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हा कैदी फरार झाला आहे की, तुरुंगातच कुठे तरी लपला आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथी तुरुंगात एक अजब घटना घडली आहे. येथील तुरुंगामधून एक कैदी अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हा कैदी फरार झाला आहे की, तुरुंगातच कुठे तरी लपला आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या या कैद्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी डेप्युटी जेलर आणि आणखी दोन जणांना निलंबित करण्यात आलं आहे. दिनक्रमानुसार कैद्यांची मोजणी सुरू असताना एक कैदी कमी आढळल्याने पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं, त्यानंतर या कैद्याची शोधाशोध सुरू आहे.
कानपूरमधील हा कडेकोट बंदोबस्त असलेला हा तुरुंग सिव्हिल लाईनमध्ये आहे. रात्री जेव्हा नेहमीप्रमाणे तुरुंग प्रशासनाने कैद्यांची मोजणी केली तेव्हा त्यात एक कैदी कमी असल्याचे निदर्शनास आले. एक कैदी कमी असल्याचे समोर येताच तुरुंगात खळबळ उडाली. कैद्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली. मात्र तरीही एक कैदी कमी असल्याचे दिसून आले. तुरुंगातून बेपत्ता असलेल्या कैद्याचं नाव आशिरुद्दीन असं आहे.
या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. तसेच या कैद्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. आशिरुद्दीन नावाच्या या कैद्याला १४ जानेवारी २०२४ रोजी जाजमऊ येथे झालेल्या एका हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून मित्राची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
दरम्यान, हा कैदी बेपत्ता असल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. आतापर्यंत अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. तरीही या कैद्याचा काहीही मागमूस लागलेला नाही. तो कसा फरार झाला हेही तुरुंग प्रशासनाला कळत नाही आहे. त्यामुळे तुरुंगातील गटार आणि झाडांवरही त्याचा शोध घेतला जात आहे. तो तुरुंगातच लपून बसला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवरही संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.