भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 00:07 IST2025-10-08T00:07:36+5:302025-10-08T00:07:59+5:30
Himachal Pradesh Bus Accident: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे भूस्खलन होऊन बसवर दरड कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. बालूघाट येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात संपूर्ण बस दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पण या अपघातादरम्यान, एक आश्चर्यकारक घटना घडली असून, दोन मुली आणि एक मुलगा चमत्कारिकरीत्या बचावले आहेत.

भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली
हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे भूस्खलन होऊन बसवर दरड कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. बालूघाट येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात संपूर्ण बस दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप केवळ १५ मृत्यूंना दुजोरा देण्यात आला आहे. पण या अपघातादरम्यान, एक आश्चर्यकारक घटना घडली असून, दोन मुली आणि एक मुलगा चमत्कारिकरीत्या बचावले आहेत.
अपघातस्थळी मदत कार्य सुरू झाल्यावर अपघातग्रस्त बसमधून दोन छोट्या मुली आणि एका मुलाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या अपघातात एका मुलीच्या आईचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसमधून ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. हे प्रवासी जवळील मरोतन, बरठी, घुमारवी आणि इतर थांब्यांवरील प्रवासी होते. या अपघातात बसचालक आणि वाहकाचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न बचाव दलाकडून सुरू आहेत. त्याचदरम्यान ही मुलं आश्चर्यकारकरीत्या जिवंत सापडली. दरम्यान, ही मुलं कुठून आली. त्यांच्यासोबत कोण प्रवास करत होतं याची माहिती समोर आलेली नाही.