लालू प्रसाद यादव यांनी या नेत्याची भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ, समिकरणं बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:27 IST2024-08-08T20:27:13+5:302024-08-08T20:27:47+5:30
Bihar Politics News: बिहारच्या राजकारणामध्ये चढउतार येतच असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सुरू केलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

लालू प्रसाद यादव यांनी या नेत्याची भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ, समिकरणं बदलणार?
राजकारणामध्ये कुणी कुणाचा मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हटलं जातं. कोण कधी कुणासोबत आघाडी करेल आणि कोण कधी आपली युती मोडेल हे सांगता येत नाही. बिहारच्या राजकारणामध्ये तर असे चढउतार येतच असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सुरू केलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी दिवंगत मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या पत्नी हिना शहाब यांची भेट घेतली. या तिघांचीही भेट पाटणा येथील बोरिंग रोड येथील आरजेडीच्या एका आमदाराच्या घरी झाली. अचानक झालेल्या या भेटीमुळे बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
सुमारे तासभर चाललेल्या या भेटीमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या निधनानंतर लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि हिना शहाब यांच्यात झालेली ही पहिलीच मोठी बैठक आहे. शहाबुद्दीन कुटुंबीय आणि लालू प्रसाद यादव यांच्यात बिघडलेल्या संबंधांना पुन्हा दुरुस्त करण्यासाठीचं पाऊल म्हणून या भेटीकडे पाहिलं जात आहे.
आरजेडीकडून हिना शहाब यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिना शहाब यांनी सिवान येथून अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. दरम्यान, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत त्यांची सकारात्मक वातावरणात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आता हिना शहाब पुन्हा एकदा आरजेडीमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच येणाऱ्या काळात हिना शहाब यांचा मुलगा ओसामा शहाब हा किंवा त्यांचा सून सिवानमधील रघुनाथपूर विधानसभा मतदारसंघातून आरजेडीकडून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय हिना शहाब यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल, असा दावाही केला जात आहे.