Lakhimpur Kheri Incident: आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 06:52 IST2021-10-08T06:51:32+5:302021-10-08T06:52:18+5:30
Lakhimpur Kheri Violence hearing in supreme court: लखीमपूर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाचा तपास समाधानकारक वाटत नाही, अशा तक्रारी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केल्या होत्या.

Lakhimpur Kheri Incident: आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी
नवी दिल्ली : लखीमपूरमध्ये वाहनाखाली शेतकरी चिरडल्याच्या प्रकरणाचा तपास नीट होत नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत, असे सुनावत या प्रकरणात कोण आरोपी आहेत? किती आरोपींना अटक केली, ही माहिती उद्या शुक्रवारपर्यंत सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे.
लखीमपूर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाचा तपास समाधानकारक वाटत नाही, अशा तक्रारी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींचे न्यायालयाने जनहित याचिकेत रूपांतर केले आणि त्यावर सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली.
घटनास्थळी गोळीबार झाला नाही, मृतदेहांतही गोळ्या आढळल्या नाहीत, असे पोलीस सांगत होते. मात्र गोळीबार झाला होता आणि आम्हाला तिथे बुलेट सापडल्या आहेत, असे पोलिसांनी प्रथमच मान्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा आणि गोळीबार करण्याचा कट होता का, हे तपासले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालताच आशिष मिश्राला लगेचच हजर व्हावे, असे समन्स पोलिसांनी जारी केले.