कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजी; बंडखोरांना भाजपाची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 15:16 IST2018-12-24T15:15:33+5:302018-12-24T15:16:04+5:30
कॅबिनेटमधून बाहेर काढल्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. तर, माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजी; बंडखोरांना भाजपाची ऑफर
बंगळुरु : कर्नाटकातील मुख्यमंत्री के. एचडी. कुमारस्वामी यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार करण्यात आला. यावेळी मंत्रिमंडळात नवीन आठ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दोन मंत्र्याना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. डच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये काँग्रेसचे नेते रमेश जारकीहोळी आणि अपक्ष आमदार आर. शंकर यांच्या समावेश आहे.
दरम्यान, कॅबिनेटमधून बाहेर काढल्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. तर, माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, यासाठी रामलिंगा रेड्डी यांनी सोमवारी विरोध प्रदर्शन सुद्धा केले. दुसरीकडे, काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांचे भाजपा स्वागत करेल, असे वक्तव्य भाजपाचे नेते सदानंद गौडा यांनी केले आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण सध्या तापल्याचे दिसून येत आहे.
Ramalinga Reddy,Congress: Juniors should become ministers,but 4-5 who became ministers before, they're still in cabinet including RV Deshpande,DK Shivakumar,G Parameshwar&others. My question is,you kept all these ppl who are capable&seniors but removed me. I'm asking why? (23.12) pic.twitter.com/aBicseZcDg
— ANI (@ANI) December 24, 2018
मुख्यमंत्री के. एचडी. कुमारस्वामी सरकारचा सहा महिन्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. पालिका प्रशासन हे कमी महत्त्वाचे खाते दिल्यामुळे रमेश जारकीहोळी नाराज होते. त्यामुळे रमेश जारकीहोळी हे गेले काही दिवस भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच रमेश जारकीहोळी यांना बाहेरचा रस्ता दाखलिल्याचे समजते.
मंत्रिमंडळातील आठ नव्या मंत्र्यांमध्ये रमेश जारकीहोळी यांचे बंधू सतीश जारकीहोळी यांच्यासह एम. बी. पाटील, सी.एस. शिवाल्ली, एम.टी.बी. नागराज, ई तुकाराम, पी. टी. परमेश्वर नाईक, रहीम खान आणि आर. बी. थिम्मापूर यांचा समावेश आहे. यातील सात मंत्री हे उत्तर कर्नाटकातील आहेत.