'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:16 IST2025-08-08T18:15:40+5:302025-08-08T18:16:37+5:30

Mahadevi Elephant : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील माधुरी हत्ती पुन्हा परत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते.

Kolhapur Mahadevi Elephant 'here is no center in Maharashtra to treat Mahadevi the elephant PETA declares its position | 'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका

'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका

मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील 'माधुरी हत्ती'  परत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची गुजरातमधील 'वनतारा' प्रशासनाने दखल घेतली. वनताराचे सीईओंनी कोल्हापुरात येऊन महास्वामी यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टातील याचिकेला आम्हीही पाठिंबा देत असल्याचे जाहीर करुन नांदणीमध्ये माधुरी हत्तीसाठी वैद्यकीय सेवा पुरवणार असल्याचे जाहीर केले. यानंतर 'माधुरी' पुन्हा नांदणीत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, आता पुन्हा एकदा पेटा इंडियाने एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनामध्ये 'पेटा'ने हत्तीला वैद्यकीय सेवा देण्यासाठी महाराष्ट्रात एकही सुसज्ज केंद्र नसल्याचा दावा केला आहे. 

तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय

"१६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाशी आम्ही सहमत आहोत, यामध्ये 'माधुरी'ची बिघडणारी प्रकृती लक्षात घेता तिच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे असे म्हटले होते. जसे मानवांना कधीकधी रुग्णालयात दाखल करणे, विशेष काळजी घेणे आणि निवृत्तीची आवश्यकता असते, तसेच हत्तींना देखील असते. ज्याप्रमाणे मानवांना मानसिकतेसाठी इतर लोकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे हत्तींना देखील असते. कारण ते कळपात राहणारे प्राणी आहेत.  माधुरी हत्ती वनतारामध्ये पहिल्यांदाच एका हत्ती मित्राला भेटली आहे, असंही या निवेदनात पेटाने म्हटले आहे.

'माधुरी हत्तीला' वैद्यकीय सेवेची गरज

आपल्या निवेदनात पेटाने म्हटले की,'माधुरी'ला बऱ्याच काळापासून विशेष पशुवैद्यकीय काळजी आणि इतर हत्तींच्या सहवासाची आवश्यकता आहे. म्हणूनच, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने माधुरीला उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय उपचार, साखळ्यांपासून मुक्तता आणि पुनर्वसनाच्या संधी मिळाव्यात यासाठी दिलेल्या निर्णयाचे आम्ही पूर्ण समर्थन करतो. माधुरीला गंभीर ग्रेड 4 संधिवात, पाय कुजणे आणि तणावाची लक्षणे आहेत.

३३ वर्षांच्या एकांतवासानंतर आणि कडक सिमेंटच्या जमिनीवर राहिल्यानंतर माननीय न्यायालयाने 'माधुरी'ला नवीन जीवन देण्याचा निर्णय घेतला. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ हत्ती अनेकदा आक्रमक होतात, माधुरीच्या हातून आधीच एका प्रमुख स्वामीजींचा मृत्यू झाला आहे. यामुळे तिला किती त्रास होत असेल हे स्पष्ट होत असल्याचे पेटाने म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्रात अशी इतर कोणतीही केंद्र नाहीत

"माधुरीला एक शांत जागा हवी आहे. तिथे ती मुक्तपणे हालचाल करू शकेल, तिच्या दुखणाऱ्या पायांना आराम देण्यासाठी आणि सौम्य व्यायाम देण्यासाठी पाण्याचा स्रोत, तिच्या अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी प्रगत पशुवैद्यकीय उपकरणे आणि तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. 'वनतारा'मध्ये या सर्व सुविधा आहेत. सध्या महाराष्ट्रात अशी इतर कोणतीही केंद्रे नाहीत, असंही पेटा इंडियाने म्हटले आहे.

"भविष्यात वनताराच्या सुविधा, काळजी आणि हत्तींबद्दलच्या आदराशी जुळणारे पुनर्वसन केंद्र बांधता आले तर, पेटा इंडिया माधुरीच्या उपचारांना विरोध करणार नाही, जसे आम्ही उत्तर प्रदेशातील वाइल्डलाइफ एसओएस आणि कर्नाटकातील वाइल्डलाइफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवल्या जाणाऱ्या इतर सुटका केलेल्या हत्तींना पाठिंबा देते. जर ती केंद्रे वनताराच्या समान आवश्यकता पूर्ण करत असतील तर जिथे हत्तींवर अत्याचार केले जात नाहीत, साखळदंडात बांधले जात नाहीत किंवा शस्त्रांनी नियंत्रित केले जात नाहीत. हे केंद्र विशेषतः माधुरी आणि इतर सुटका केलेल्या हत्तींना कायमस्वरूपी काळजी देण्यासाठी डिझाइन केलेले आहे, हे देखील महत्त्वाचे आहे, असंही पेटाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालय आवश्यक पावले उचलेल याचा आम्हाला विश्वास

"गर्दी आणि रहदारीपासून दूर शांत ठिकाणी स्थित आहे आणि प्राणीसंग्रहालयासारखे पर्यटक-केंद्रित वातावरण नाही. माधुरीसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे शांत, साखळीमुक्त वातावरणात राहणे जिथे तिचे शारीरिक आणि मानसिक उपचार होऊ शकतात. 'पेटा इंडियाची एकमेव चिंता म्हणजे माधुरीला हवी असलेली काळजी, शांती आणि सन्मान मिळावा. सर्वोच्च न्यायालयाने याची खात्री केली आणि जर हा खटला पुन्हा समोर आला तर आम्हाला विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय या दिशेने आवश्यक पावले उचलेल, असा विश्वासही पेटा इंडियाने व्यक्त केला आहे.


Web Title: Kolhapur Mahadevi Elephant 'here is no center in Maharashtra to treat Mahadevi the elephant PETA declares its position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.