घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:52 IST2025-10-25T09:43:27+5:302025-10-25T09:52:16+5:30
एका तरुणीने स्वतःच्या काका आणि काकू विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या तरुणीच्या घरात असलेली मांजरीची पिल्ले गायब झाल्याने तिने ही तक्रार दाखल केली आहे.

AI Generated Image
कोण कोणावर कशाचा राग कधी काढेल काही सांगता येत नाही. कधी कधी पूर्ववैमनस्यातून लोक मागचा पुढचा विचार न करता चुकीचे पाऊल उचलतात. मात्र, आता एक असे प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल. उत्तरखंडच्या देहरादूनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने स्वतःच्या काका आणि काकू विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या तरुणीच्या घरात असलेली मांजरीची पिल्ले गायब झाल्याने तिने ही तक्रार दाखल केली आहे.
या तरुणीच्या घरात मांजरीची काही पिल्ले होती. ती या पिल्लांची देखभाल करत होती. मात्र, तिच्या घरातून ही पिल्ले गायब झाल्यानंतर ती संतापली. आपल्या घरात असलेली मांजरीची पिल्ले आपल्याच काका आणि काकूने चोरून कुठे तरी दूर सोडून आल्याचा आरोप तिने लावला आहे. त्यांना मांजरीची पिल्ले आवडत नव्हती म्हणूनच त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप तिने केला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण धर्मपूरमधील नेहरू कॉलनीमध्ये घडले असून, मांजरीवरून सुरू झालेला वाद आता टोकाला पोहोचला आहे. रश्मी धीमान या तरुणीने काका उमेश धीमान, काकी सुमन धीमान आणि चुलत भाऊ शुभम, विशाल आणि सश्रम यांच्या विरोधात धमकावणे, त्रास देणे आणि मांजरीच्या पिल्लांसोबत क्रूरता केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
रश्मीने आपल्या तक्रारीत म्हटले की, १२-१३ मार्च रोजी एक मांजर त्यांच्या घरात आली होती. यावेळी त्या मांजरीने तिची दोन पिल्ले घरातच सोडली आणि ती निघून गेली. तेव्हापासून रश्मी या पिल्लांची काळजी घेत होती. रश्मीचे काका-काकू वेगळ्या घरात राहत असले तरी त्यांचे अंगण एकच होते. त्यांना मांजरी आवडत नव्हत्या. म्हणूनच त्यांनी मांजरीच्या पिल्लांना स्कूटरच्या डिक्कीमध्ये बंद केलं आणि दूर नेऊन सोडलं. त्यांना याबद्दल विचारण्यास गेले असता, त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली.
रश्मीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून, या प्रकरणी काका-काकू आणि त्यांच्या तिन्ही मुलांची चौकशी केली जाणार आहे.