Kishtwar cloud burst Latest Video: 'दहा जणांचे मृतदेह आम्ही स्वतः बाहेर काढले. जे वेळीच पळाले, ते वाचले. नवीन घर बांधलं होतं, ते वाहून गेलंय. मुलं बेघर झालीयेत.' दुःखाचा आवंढा गिळत चशोटीतील वाचलेले लोक ढगफुटीनंतर घडलेल्या विध्वंसाच्या कहाण्या सांगत आहेत. जम्मू काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या चशोटीचा ढगफुटीने घास घेतला. तिथली दृश्य संवेदनशील माणसांच्या काळीज पिळवटून टाकणारी आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशात सगळीकडे स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरू असताना किश्तवार जिल्ह्यातील चशोटीवर निसर्ग कोपला. मचैल माता मंदिराच्या वाटेवर असलेल्या आणि मंदिरापासून जवळच असलेल्या चशोटीमध्ये यात्रेमुळे उत्साह होता. दुकानं सजलेली होती. ठिकठिकाणच्या भाविकांचे जत्थे दाखल होत होते. अनेकांनी तंबू लावले होते. पण, क्षणात सगळं दृष्टीआड गेलं.
ढगफुटी होऊन दुपारी १२.३० वाजता प्रचंड मोठा पाणी आणि मातीचा ढिग वाहून आला. त्याने चशोटीतील घरे गाडली गेली. आता तिथे फक्त मृतदेहांच्या रांगा आणि कुटुंबीयांचा आक्रोश ऐकायला येत आहे.
'घराखाली दहा जण दबले, त्यांचे मृतदेह आम्हीच बाहेर काढले'
या भयावह घटनेचा अनुभव सांगताना सलाहुल हसन म्हणाला, 'मंदिराजवळ भंडारा सुरू होता. तिथे खूपच गर्दी होती. अनेक दुकाने लागलेली होती. ते सगळे पाणी आणि मातीच्या ढिगाऱ्याबरोबर वाहून गेले. अनेक भाविक होते. ते सगळे ढिगाऱ्या खाली दबले गेले. एक इमारत जमीनदोस्त झाली, तिच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले. १० जणांचे मृतदेह आम्हीच बाहेर काढले. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. त्या ओढ्याजवळ १००-१५० लोक होते. ते सगळे पुरात वाहून गेले. आम्ही लोकांना आवाज दिला, पण त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही', असा भयावह घटनाक्रम हसनने सांगितला.
निसर्गाच्या प्रकोपातून वाचलेली एक महिला म्हणाली, 'मी घरातच होते. मी पळतच बाहेर आले. जे पळाले, ते वाचले. माझी मोठी जाऊ घरात होती. तिने मला किचनमधून बाहेर काढले. ती खूप जखमी झाली आहे. आमचं जुनं घर व्यवस्थित आहे, पण नवीन घर वाहून गेलं."
माझा मुलगा ढिगाऱ्यात अडकला, त्याला...
दुसरी एक महिला या घटनेबद्दल बोलताना म्हणाली, 'आम्ही जेवत होतो, त्याचवेळी पळा... पळा... म्हणून काही लोक ओरडू लागले. आम्हाला कळेना की, कोणत्या दिशेने पळायचं आहे. आम्ही कुटुंबातील सगळेच धावत सुटलो. माझी बहीण, वहिनी आणि तिचे कुटुंब. आम्ही सगळे वाचलो. माझा छोटा मुलगा नाल्याच्या दिशेने पळाला आणि ढिगाऱ्यात अडकला. त्याला बाहेर काढलं. जवळपास अर्धा पाऊण तास त्याला बाहेर काढण्यासाठी लागला. ढगफुटी झाली तेव्हा तिथे शेकडो लोक होते. दुकानं होती. लोक अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत.'