केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:27 IST2026-01-13T18:26:28+5:302026-01-13T18:27:45+5:30
Kerala State: 'केरळचे नाव बदलल्याने धर्माच्या आधारावर राज्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतिरेकी शक्तींना आळा बसेल.'

केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
Kerala State: केरळ भाजपने डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकारच्या राज्याचे नाव बदलून "केरळम" करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. केरळ भाजपने या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना पत्र लिहून पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या पत्रात लिहिले की, केरळचे नाव "केरळम" केल्याने धर्माच्या आधारावर राज्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतिरेकी शक्तींच्या प्रयत्नांना आळा बसेल. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असेही म्हटले की, राज्य विधानसभेने अधिकृत नोंदींमध्ये राज्याचे नाव "केरळ" वरून "केरळम" करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
Kerala: BJP State President Rajeev Chandrasekhar has written to Prime Minister Narendra Modi seeking his support and intervention in officially naming the state as 'Keralam' pic.twitter.com/YJpQ7c1Ejf
— IANS (@ians_india) January 13, 2026
आमची विचारसरणी परंपरांच्या संरक्षण आणि आदरावर आधारित आहे
राजीव चंद्रशेखर पुढे म्हणतात, भारतीय जनता पक्षाची विचारधारा भाषिक संस्कृती आणि परंपरांच्या संरक्षण आणि आदरावर आधारित आहे. भाजपने नेहमीच राज्याला "केरळम" म्हणून पाहिले आहे, जे हजारो वर्षांच्या परंपरा, वारसा आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटले की, आम्ही तुमच्या हस्तक्षेपाची अपेक्षा करतो, जेणेकरून राज्याचे नाव केरळम ठेवण्याचा निर्णय घेता येईल.
विकसित आणि सुरक्षित केरळची अपेक्षा
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना लिहिलेल्या पत्रात राजीव चंद्रशेखर यांनी ‘विकसित आणि सुरक्षित केरळ’ उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विविध धार्मिक श्रद्धा असलेल्या सर्व मलयाळी नागरिकांच्या विश्वासाचा सन्मान राखणारे राज्य निर्माण व्हावे, असे त्यांनी नमूद केले.