काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:19 IST2025-12-06T11:18:39+5:302025-12-06T11:19:32+5:30
Kerala Local body Election: राजकारण आणि सत्ताकारणामध्ये नवनवी आणि अजब समीकरणं जुळणं ही आता नित्याची बाब झालेली आहे. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशा आघाड्या दिसून आल्या होत्या. आता केरळमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का देणारी आघाडी समोर आली आहे.

काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी
राजकारण आणि सत्ताकारणामध्ये नवनवी आणि अजब समीकरणं जुळणं ही आता नित्याची बाब झालेली आहे. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशा आघाड्या दिसून आल्या होत्या. आता केरळमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का देणारी आघाडी समोर आली आहे. केरळमध्ये काही ठिकाणी काँग्रेस, सीपीआयएम आणि भाजपा या एकमेकांच्या कट्टर विरोधक असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत एकमेकांचे विरोधी पक्ष असलेले हे पक्ष एकत्र कसे काय आले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, काँग्रेस, भाजपा आणि डावे हे विरोधी पक्ष एकत्र येण्यामागचं नेमकं कारणही आता समोर आलं आहे. कोचीजवळ असलेल्या किकेक्स ग्रुपची राजकीय संघटना असलेल्या ट्वेंटी-२०चा प्रभाव सध्या राज्यातील अनेक भागात वाढत चालला आहे. त्यामुळे या ट्वेंटी-२० संघटनेचा प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेस भाजपा आणि सीपीआयएम हे पक्ष एकत्र आले आहेत. ९ आणि ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक पालिका निवडणुकीत ट्वेंटी-२० पक्षाला आव्हान देण्यासाठी या पक्षांनी किजक्कम्बलम येथे संयुक्तरीत्या अपक्ष उमेदवार उतरवले आहेत.
किजक्कम्बलम गावाचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून किटेक्स ग्रुपने २०१३ साली ट्वेंटी-२० पक्षाची स्थापना सीएसआर कार्यक्रम म्हणून केली होती. या कंपनीने २०१५ साली पहिल्यांदा पंचायतीची निवडणूक लढवून जिंकली होती. तर २०२० मध्ये या कंपनीने आणखी तीन पंचायती आपल्या ताब्यात घेतल्या होत्या.
या दरम्यान, यावेळी ही ट्वेंटी-२० संघटना ४८ पंचायती, कोची महानगरपालिका, तीन नगर परिषदा आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढवत आहे. काही पंचायतींमध्ये सर्व जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. त्यात पुथ्रिका पंचायतीमध्ये या संघटनेने सर्व जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. ट्वेंटी-२० ग्रुपच्या या प्लॅनिंगमुळे माकपासह भाजपा आणि काँग्रेस या पक्षांमध्ये घबराट पसरली आहे. ट्वेंटी-२० पक्षाचे अध्यक्ष आणि किटेक्सचे एमडी साबू एम. जेकब यांनी सांगितले की, ‘’आमच्या पक्षाने चार पंचायतींमधील भ्रष्टाचार संपुष्टात आणला आहे. तसेच सुमारे ५० कोटी रुपयांची बचत केली आहे’’. दरम्यान, किजक्कम्बलम येथे ५० टक्के सब्सिडीसह वस्तू देणाऱ्या फूड सेफ्टी मार्केटने पक्षाला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारींनंतर हा बाजार बंद करण्यात आला होता.
ट्वेंटी-२० पक्षाचं निवडणूक चिन्ह आंबा हे आहे. मात्र या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार त्यांच्याविरोधात वेगवेगळी चिन्हे घेऊन उतरले आहेत. त्यामुळे ही लढत आणखीनच रंगतदार झाली आहे. एकूणच किटेक्स समुहाच्या ट्वेंटी-२० या राजकीय संघटमेने केरळमधील राजकारणाला नवं वळण दिलं आहे.