एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:19 IST2025-08-27T18:16:45+5:302025-08-27T18:19:34+5:30
Kedarnath: कुटुंबाचा ३० ऑगस्ट २०२४ रोजी शेवटचा संपर्क झालेला.

एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
Kedarnath: उत्तराखंडमधीलकेदारनाथ मंदिराच्या वरच्या भागात असलेल्या चौराबारी हिमनदीजवळ एका व्यक्तीचा सांगाता सापडल्याची घटना घडली आहे. एका वर्षापासून बेपत्ता असलेल्या तेलंगणातील भाविकाचा सांगाडा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी चौराबारी हिमनदी परिसरात दर्शनासाठी गेलेल्या लोकांना दगडांमध्ये मानवी सांगाडा दिसला.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्येच व्यवसाय करणारे काही व्यापारी चौराबारी परिसरात गेले होते, तेव्हा त्यांना हा सांगाडा दिसला. या व्यापाऱ्यांच्या माहितीवरुन, पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सांगाडा ताब्यात घेतला. या सांगाड्याजवळ एक बॅगही सापडली ज्यामध्ये त्या यात्रेकरुचे ओळखपत्र होते. नोमुला रोशवंत असे त्याचे नाव असून, तो तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी होता.
घरातून निघताना दिल्लीला जात असल्याचे सांगितले
केदारनाथमध्ये तैनात असलेले यात्रा निरीक्षक राजीव चौहान म्हणाले की, ओळखपत्राच्या आधारे तेलंगणा पोलिस आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी नोमुला बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती. कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी त्यांचा नोमुलाशी शेवटचा संपर्क झाला होता. तेव्हा त्याने उत्तराखंडमध्ये असल्याचे सांगितले होते. लवकरच हा सांगाडा कुटुंबाच्या स्वाधीन केला जाईल.