क्रू मेंबरच्या एका सल्ल्यामुळे व्हायरल डांसरचा वाचला जीव; म्हणाली, "आधी विचार आला पण त्याने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 23:27 IST2025-12-07T23:23:53+5:302025-12-07T23:27:20+5:30
गोव्यातील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

क्रू मेंबरच्या एका सल्ल्यामुळे व्हायरल डांसरचा वाचला जीव; म्हणाली, "आधी विचार आला पण त्याने..."
Goa Club Fire: उत्तर गोव्यातील अरपोरा-नागोवा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान २५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ पर्यटक आणि क्लबमधील १४ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, ७ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. या क्लबमध्ये घटनेच्या वेळी अंदाजे २०० हून अधिक लोक उपस्थित होते.
प्रत्यक्षदर्शी आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या डांसरने दिलेल्या माहितीनुसार, आगीची सुरुवात बेली डान्सच्या परफॉर्मन्सदरम्यान फटाके पेटवल्याने झाली असण्याची शक्यता आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११.३० वाजता स्टेजवर बेली डान्स सुरू असताना क्लब व्यवस्थापनाने काही फटाके पेटवले. हे फटाके छतावरील बांबू, फायबर आणि गवत यांसारख्या ज्वलनशील सजावटीच्या सामानांच्या संपर्कात आले. यामुळे छतावर ठिणग्या उडून धूर निघाला आणि अवघ्या काही मिनिटांत आग पसरली.
डांसर क्रिस्टीना वाचली
या घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कझाकस्तानची डांसर क्रिस्टीना परफॉर्म करताना दिसत होती. "आग लागताच लोक बाहेर पडण्यासाठी धावू लागले. क्लबमधील कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी एकमेकांना मदत केली. माझा पहिला विचार माझ्या चेंजिंग रूममध्ये जाण्याचा होता. पण माझ्या क्रू मेंबरने मला रोखले आणि तिथे जाऊ नकोस असे सांगितले. केवळ याच एका निर्णयामुळे माझा जीव वाचला. जेव्हा मी घरी येऊन माझ्या मुलीला मिठी मारली, तेव्हा मी जिवंत असल्याबद्दल देवाचे आभार मानले. तो त्या दिवसाचा माझा दुसरा परफॉर्मन्स होता," असं क्रिस्टीनाने सांगितले.
अंधार, धूर आणि धावपळ
कर्नाटकहून वीकेंड ट्रिपवर आलेल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या एका ग्रुपमधील प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती देताना, क्लबमधील भयाण परिस्थिती सांगितली. "आग लागताच सगळ्या लाईट्स गेल्या आणि पूर्णपणे अंधार झाला. सर्वत्र प्रचंड धूर पसरला होता. लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. खूप जास्त धक्का-मुक्की सुरू होती आणि मी काही स्फोटांचे आवाज ऐकले. मला वाटले की चेंगराचेंगरी होईल," असे त्यांनी सांगितले.
बेकायदा क्लबवर कारवाईचे आदेश
या दुर्घटनेनंतर अरपोरा पंचायतने बर्च नाईट क्लबच्या अवैध बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंचायतने या क्लबला कारणे दाखवानोटीस बजावली असून, क्लबचे बांधकाम पाडण्याचे आदेशही दिले आहेत. क्लबकडे आवश्यक परवानग्या आणि प्रमाणपत्र नव्हते, अशी माहिती यापूर्वीच समोर आली आहे.