शिडांत वारे घेऊन ‘कौंडिण्य’ ओमानकडे रवाना; १५ दिवसांत १८ नौसैनिक पार करतील १,४०० किमी अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:57 IST2025-12-30T11:56:18+5:302025-12-30T11:57:11+5:30
ओमान हा देश निवडण्यामागे कारण असे की, प्राचीन भारताचा समुद्री व्यापार ओमानमार्गे पश्चिम आशियाकडे होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जहाजाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

शिडांत वारे घेऊन ‘कौंडिण्य’ ओमानकडे रवाना; १५ दिवसांत १८ नौसैनिक पार करतील १,४०० किमी अंतर
पोरबंदर : १५०० हून अधिक वर्षांपूर्वीचे प्राचीन भारतीय जहाज बांधणीचे तंत्र वापरून तयार केलेले ६५ फूट लांबीचे नौदलाचे ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ हे जहाज गुजरातमधील पोरबंदरहून ओमानची राजधानी मस्कतकडे सोमवारी रवाना झाले. या जहाजाला इंजिन नाही. त्यात पोलादाचा, खिळ्यांचा वापर नाही की वेगासाठी आधुनिक यंत्र नाही. शिडांत वारे घेऊन ते ओमान दिशेने रवाना झाले.
ओमान हा देश निवडण्यामागे कारण असे की, प्राचीन भारताचा समुद्री व्यापार ओमानमार्गे पश्चिम आशियाकडे होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जहाजाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. जहाजाची बांधणी पारंपरिक भारतीय शिवणतंत्रावर असून लाकडी फळ्या जोडण्यासाठी नारळाच्या काथ्यांचा वापर केला आहे. शक्ती व ऊर्जेचे प्रतीक म्हणून शिडांवर गंडाभेरुंड हा पौराणिक पक्षी व सूर्याचे चित्र छापले आहे. जहाजाच्या अग्रस्थानी सिंहाची पौराणिक आकृती कोरली आहे. डेकवर हडप्पा काळाची आठवण देणारा दगडी नांगर ठेवला आहे.
‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ची कल्पना नेमकी काय? -
अजंठा गुंफेतील ५ व्या शतकातील चित्रातून या जहाज निर्मितीची प्रेरणा घेण्यात आली. जहाज बांधणी तज्ज्ञ, नौदलातील अभियंत्यांनी या चित्रातील रचनेचा अभ्यास करून हे जहाज साकारले.
भारताच्या प्राचीन सामुद्रीक वारशाला पुन्हा उजाळा देणे, हा वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे संरक्षण खात्याने म्हटले आहे.
‘कौंडिण्य’च्या या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, ओमानचे राजदूत ईसा सालेह अल शिबानी हे उपस्थित होते.