कर्नाटकातील चडचण बँक लुटीतील ऐवज सापडला घराच्या छतावर, दरोडेखोरांच्या शोधात १२ पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:21 IST2025-09-19T12:21:01+5:302025-09-19T12:21:39+5:30
हुलजंतीमधून ऐवज हस्तगत

कर्नाटकातील चडचण बँक लुटीतील ऐवज सापडला घराच्या छतावर, दरोडेखोरांच्या शोधात १२ पथके रवाना
मंगळवेढा/जत/उमदी : कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँकेवरील दरोड्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्याआधारे शोध घेत असतानाच मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावातील एका पडक्या घराच्या छतावर सोन्याचे दागिने व रोकड असलेली बॅग सापडली आहे.
बँक दरोडा तपासाच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व कर्नाटकचे पोलिस अधिकारी मंगळवेढा येथे पोलिस ठाण्यात आले होते. यादरम्यान हुलजंती येथे एका पडक्या घरावर एक बॅग असल्याबाबत स्थानिक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व कर्नाटक पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.
त्यांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्यात सोने व रोकड आढळून आली. पंचांच्या समक्ष पंचनामा करून ती बॅग कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. यामध्ये किती रक्कम व सोने आहे याचा तपशील मिळू शकला नाही; मात्र या दरोड्यातील बहुतांशी रक्कम व सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे समजते.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या दरोड्यात बुरखाधारी दरोडेखोरांनी २० किलो सोने व एक कोटी ४० लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. त्यांनी पळून जाताना बनावट नंबरप्लेटची कार वापरली होती. दरोडेखोर पळून जाताना हुलजंती येथे त्याच्या गाडीने दुचाकीला ठोकरले. त्यामुळे स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता दरोडेखोरांनी गाडी सोडून पळ काढला. 
त्यानंतर रात्रभर महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी हुलजंती परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, दरोडेखोरांचा मागमूस लागला नव्हता. तसेच मुद्देमाल हाती लागला नव्हता. कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांची १२ संयुक्त पथके आरोपींचा तपास करत आहेत. गुरुवारी दुपारी पोलिसांना खबर मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी हुलजंती येथील त्या पडक्या घरातील सोने व पैशाची बॅग जप्त करून कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र, दरोडेखोरांनी कोट्यवधींचा माल लुटून पळताना ही बॅग टाकून दिली की जाणीवपूर्वक गुप्त ठिकाणी ठेवली, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.