Karnataka New CM: सिद्धरामैय्या मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित; डीके शिवकुमार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:45 IST2023-05-16T13:32:05+5:302023-05-16T13:45:26+5:30
Karnataka New CM Face: आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.

Karnataka New CM: सिद्धरामैय्या मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित; डीके शिवकुमार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी
Karnataka New CM Face:कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर आता काँग्रेससमोर मुख्यमंत्री ठरवण्याचे मोठे आव्हान आहे. कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा आज(मंगळवारी) सायंकाळी होऊ शकते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करू शकतात. सिद्धरामैय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडू मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसने कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सिद्धरामैय्या यांना पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री केले जाणार आहे. तर, डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदासह एक महत्वाचे खाते देण्यात येणार आहे. यासोबतच डीके यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असेल.
सिद्धरामय्या यांचे नाव पुढे
काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे, परंतु सिद्धरामेय्या राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. डीके शिवकुमार यांच्यापेक्षा सिद्धरामय्या यांचा दावा मजबूत असल्याचे बोलले जात आहे. सोमवारीच ते दिल्लीत पोहोचले आहेत, तर डीके शिवकुमार आज दिल्लीसाठी रवाणा होणार आहेत.
रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीत काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांनी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांचे मत जाणून घेतले. यामध्ये आमदारांशी स्वतंत्र चर्चा झाली. यासोबतच मुख्यमंत्रिपदासाठी गुप्त मतदान घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी तीन केंद्रीय निरीक्षकांनी आमदारांच्या गुप्त स्लिप घेऊन नवी दिल्ली गाठली आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमदारांचे मत कळवले. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना शिवकुमारपेक्षा दुप्पट आमदारांचा पाठिंबा आहे.