कर्नाटकात लोकायुक्तांच्या १० सरकारी अधिकाऱ्यांच्या ४७ ठिकाणांवर धाडी; तब्बल ३५.३१ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:47 IST2025-11-26T18:47:49+5:302025-11-26T18:47:49+5:30
४७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कर्नाटकात लोकायुक्तांच्या १० सरकारी अधिकाऱ्यांच्या ४७ ठिकाणांवर धाडी; तब्बल ३५.३१ कोटींची मालमत्ता जप्त
Karnataka Lokayukta Raid: कर्नाटक लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी राज्यातील १० सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर आणि संबंधित ४७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या छापेमारीत लोकायुक्त पोलिसांना बेहिशेबी मालमत्ता आणि रोकडसह तब्बल ३५ कोटी ३१ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात यश आले आहे. जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर ही मोठी कारवाई करण्यात आली.
लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तेत जमीन, शेतजमीन आणि आलिशान घरांसह २२.३१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय, ५.९१ कोटी रुपयांचे दागिने, २.३३ कोटी रुपयांची वाहने, ७८.४० लाख रुपयांची रोकड आणि ३.९६ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि घरगुती वस्तूंचाही समावेश आहे.
हवेरीतील अभियंत्याकडून सर्वाधिक माया उघड
या छापेमारीत हावेरी येथील जिल्हा शहरी विकास सेलचे कार्यकारी अभियंता शेखर सन्नप्पा कट्टिमनी यांच्या ठिकाणाहून सर्वाधिक बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत ५.३६ कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या सहा ठिकाणांवर शोध घेण्यात आला, ज्यात १४ जमीन नोंदी, तीन घरे, २५.४० लाख रुपयांचे दागिने आणि १५ लाख रुपयांची वाहने आढळली.
कट्टिमनी यांच्यापाठोपाठ मांड्या नगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी पुट्टास्वामी सी. यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळाली. त्यांच्याकडे आठ जमीन नोंदी, दोन घरे आणि १२ एकर शेतजमीन आणि अन्य मालमत्ता असे एकूण ४.३७ कोटी रुपयांची मालमत्ता आढळली.
इतर ८ अधिकाऱ्यांवरही कारवाई
या दोघांव्यतिरिक्त अन्य आठ सरकारी अधिकाऱ्यांवरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यात बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिक सिटी आरटीओ कार्यालयातील अधिकारी, म्हैसूर येथील महसूल निरीक्षक, दावणगेरे येथील सहाय्यक संचालक, यादगिरी येथील मुख्य अभियंता, धारवाड येथील असोसिएट प्रोफेसर, गदग येथील पशुवैद्यकीय परीक्षक, बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि शिवमोगा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांकडेही कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.
कर्नाटकमध्ये एकाच वेळी करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लोकायुक्तांनी ही कारवाई तक्रारींच्या आधारावर केल्याचे समोर आले आहे.