कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:49 IST2025-12-03T12:49:23+5:302025-12-03T12:49:55+5:30
Divya Gehlot Dowry news: दिव्या गेहलोत यांचे लग्न २९ एप्रिल २०१८ रोजी रतलाम जिल्ह्यातील ताल येथे मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत झाले होते.

कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
रतलाम : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या नातवावर अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. राज्यपालांचे नातू देवेंद्र गेहलोत यांच्या पत्नी दिव्या गेहलोत यांनी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. सासरच्या मंडळींकडून ५० लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप दिव्या यांनी केला आहे.
दिव्या गेहलोत यांचे लग्न २९ एप्रिल २०१८ रोजी रतलाम जिल्ह्यातील ताल येथे मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत झाले होते. दिव्या यांनी रतलाम पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार पती देवेंद्र गेहलोत, सासरे जितेंद्र गेहलोत, दीर विशाल गेहलोत आणि आजे सासू अनिता गेहलोत यांच्यावर ५० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्याचा आरोप आहे.
हुंड्यासाठी सासरचे लोक मानसिक त्रास देत असून, पतीने वारंवार मारहाण केल्याचे यात म्हटले आहे. तसेच एकदा दिव्या यांना छतावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे त्या गॅलरीत पडल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिव्या सध्या पतीच्या छळामुळे आपल्या आई-वडिलांसोबत रतलाम येथे राहत आहेत. सासरच्या लोकांनी त्यांच्या चार वर्षांच्या मुलीलाही त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर ठेवले आहे. 'जोपर्यंत वडिलांकडून ५० लाख रुपये आणणार नाही, तोपर्यंत मुलीला भेटू देणार नाही,' अशी धमकी दिली जात असल्याचा आरोपही दिव्या यांनी केला आहे. याशिवाय, लग्नाच्या वेळी पती दारू आणि इतर नशेत असल्याचे आणि त्याचे अन्य महिलांशी संबंध असल्याचे लपवले गेले होते, असेही दिव्या यांनी सांगितले आहे.
पोलिसांकडून तपास उज्जैनकडे वळवला
दिव्या गेहलोत यांनी मंगळवारी रतलामच्या एसपी यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावर रतलामचे अतिरिक्त एसपी राकेश खाखा यांनी माहिती दिली की, सदर प्रकरण नागदा (जि. उज्जैन) येथील असल्याने, ही तक्रार पुढील तपास आणि कारवाईसाठी उज्जैनचे आयजी आणि एसपी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. या गंभीर आरोपांवर गेहलोत कुटुंबाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.