Karnataka Deputy Chief Minister G. Parameshwara meets BJP MLAs who were on an over night 'dharna' | खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री
खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

बंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्तासंघरर्षाचा दुसरा अंक सुरू झाला असून कुमारस्वामी सरकारच्या बहुमत प्रस्तावावर दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू झाली आहे. त्याआधी विधानसभेमध्ये रात्रभर धरणे आंदोलनाला बसलेल्या भाजपाच्या आमदारांना सकाळी कर्नाटकचे उप मुख्यमंत्री जी परमेश्वर हे नाश्ता घेऊन पोहोचले. भाजपामुळेच खूर्ची धोक्यात असूनही परमेश्वर यांच्या या पावलामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. 


आज विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. बहुमत प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्यावर भाजपाच्या आमदारांनी पक्षपातीपणा आणि पैसे घेतल्याचे आरोप केले. यामुळे व्यथित झालेल्या रमेश कुमार यांनी भाजपाच्या आमदारांना खरीखोटी सुनावली. तुम्ही माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत आहात, त्यांनी एकदा त्यांचे जीवन कसे राहिले याकडे एकदा पहावे. माझ्याकडे दुसऱ्यांसारखे लाखो रुपये नाहीत. पण एवढ्या अपमानानंतरही मी पक्षाला बाजुला सारून निर्णय घेऊ शकतो, असे सांगितले. 
 दरम्यान रात्री धरणे आंदोलनाला बसलेल्या भाजप आमदारांनी उशी, चादर आदी साहित्य घेत विधानभवनात बैठक मांडली होती. तसेच येडीयुराप्पांसह सर्व आमदार विधानभवनातच झोपले होते. काही जणांनी सोफ्याचा आधार घेतला होता. यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या रात्रीच्या जेवनाची व्यवस्था केली होती. तसेच सकाळीच काँग्रेसचे नेते आणि उप मुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी नाश्ता घेऊन थेट विधानभवन गाठले होते. यावेळी त्यांनी काही भाजपा आमदारांसोबत चर्चाही केली. यावेळी परमेश्वर यांनी सांगितले की, भाजपाचे आमदार रात्रभर धरणे आंदोलनाला बसले आहेत. आमचे कर्तव्य आहे की त्यांना नाश्ता पुरविणे. काही आमदारांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास आहे. यामुळे आम्ही राजकारण बाजुला ठेवून त्यांच्यासाठी नाश्ता, जेवनाची सोय केली आहे. ते आमचे मित्र आहेत. हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. 


Web Title: Karnataka Deputy Chief Minister G. Parameshwara meets BJP MLAs who were on an over night 'dharna'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.