राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:29 IST2025-08-11T17:29:03+5:302025-08-11T17:29:56+5:30
Karnatak Congress: राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या दाव्यावर टीका करणे काँग्रेसच्या मंत्र्यांना चांगलेच महागात पडले.

राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
Karnatak Congress: काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी सोमवारी निवडणूक आयोगाविरुद्ध मोठे निदर्शने केली. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत कर्नाटक सरकारचे सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी राहुल गांधी आणि पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वेगळे विधान केले. राजन्ना यांनी म्हटले की, मतदार यादी काँग्रेसच्या राजवटीत तयार करण्यात आली होती. मात्र, हे विधान मंत्री राजन्ना यांना महागात पडले आहे. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजन्ना यांचा राजीनामा घेतला आहे.
केएन राजन्ना काय म्हणाले?
कर्नाटकचे सहकार मंत्री आणि काँग्रेस नेते के.एन. राजन्ना यांनी रविवारी तुमकुरु येथे बोलताना राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर टीका केली. ते म्हणाले, "असे बोलण्याची गरज नाही. मतदार याद्या कधी बनवण्यात आल्या? या याद्या काँग्रेसच्या राजवटीत बनवण्यात आल्या आहेत. त्यावेळी कोणी का बोलले नाही? डोळे का मिटले होते? जर मी आता जास्त बोललो तर परिस्थिती आणखी बिघडेल. भाजपने चूक केली, हे खरंय. हे नाकारता येत नाही. पण हे सर्व आपल्या डोळ्यांसमोर घडले, हे देखील विचार करण्यासारखे आहे, अशी टीका राजन्ना यांनी केली होती"
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
राहुल गांधी चिडले
मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री केएन राजन्ना यांच्या विधानावर राहुल गांधी खूप संतापले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्र्यांना हायकमांडकडून स्पष्ट सूचना मिळाल्या होत्या की, राजन्ना यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकावे लागेल. त्यानुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजन्ना यांचा राजीनामा घेतला आहे. राजन्ना राजीनामा देण्यास तयार नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंतची मुदत दिली आणि सांगितले की, जर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नाही, तर त्यांना काढून टाकले जाईल. त्यानंतर राजन्ना यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केला.