'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:21 IST2025-11-27T13:19:50+5:302025-11-27T13:21:08+5:30
Karnataka Congress : कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान डीके शिवकुमार यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश
Karnataka Congress : कर्नाटककाँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड अंतर्गत कलह पाहायला मिळतोय. राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा तीव्र झाली असताना, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. राहुल गांधींनी डीकेंना थोडी वाट पाहण्याचा सल्ला दिल्याची माहिती काल समोर आली होती. त्यानंतर आता डींकेची पोस्ट चर्चेत आली आहे.
काय म्हणाले डीके शिवकुमार?
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान, डीके शिवकुमार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले की, “शब्दाची ताकद हीच जगाची ताकद आहे. दिलेला शब्द पाळणे ही सर्वात मोठी शक्ती आहे,” अशी पोस्ट त्यांनी केली. त्यांची ही पोस्ट पक्षश्रेष्ठींना इशारा म्हणून पाहिली जात आहे.
ಕೊಟ್ಟ ಮಾತು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇ ವಿಶ್ವದಲ್ಲಿರುವ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ! pic.twitter.com/klregNRUtv
— DK Shivakumar (@DKShivakumar) November 27, 2025
राहुल गांधींकडून शिवकुमारांना मेसेज
डीके शिवकुमार काही आठवड्यांपासून राहुल गांधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अखेर राहुल गांधींनी काल व्हॉट्सअॅपवर छोटासा मेसेज पाठवत प्रतिसाद दिला. “थोडी वाट पाहा, मी तुम्हाला फोन करतो,” असा राहुल गांधींनी मेसेज पाठवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले की, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी चर्चा केल्याशिवाय कर्नाटक प्रकरणावर अंतिम निर्णय घेणार नाही.
सीएम बदलाच्या चर्चांना वेग
काँग्रेसने 2023 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपद सिद्धरामैयांना दिले होते, तर डीके शिवकुमारांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. त्यावेळी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा झाली होती. 20 नोव्हेंबर रोजी सिद्धरामैया यांना अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे, शिवकुमार गट मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर डीकेंचे निकटवर्तीय नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्टींच्या भेटी घेत आहेत. आता काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरले.