कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; डीके शिवकुमार यांची 'ती' पोस्ट चर्चेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:14 IST2025-11-21T13:13:49+5:302025-11-21T13:14:51+5:30
Karnataka Congress: सिद्धरामैया सरकारचे अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे, डीकेंचे समर्थक आमदार खरगेंच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; डीके शिवकुमार यांची 'ती' पोस्ट चर्चेत...
Karnataka Congress: बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर, केंद्रीय पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच, कर्नाटककाँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष बंगळुरुहून थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार यांचे निकटचे तीन आमदार आणि एक मंत्री गुरुवारी अचानक दिल्लीला पोहोचले आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. यामुळे राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
सिद्धरामैया-डीकेंनी थोटपटले दंड
एकीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामैयांनी पुढील वर्षीचा अर्थसंकल्प स्वतःच मांडणार असल्याचे जाहीर करून मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. तर दुसरीकडे डीकेंची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 'जिकडे प्रयत्न, तिकडे फळ' अशा आशयाची पोस्ट शिवकुमारयांनी केली आहे. यामुळेच सत्ताबदलाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
ಎಲ್ಲಿ ಶ್ರಮ ಇದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಫಲವಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಇದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಇದ್ದಾನೆ.. pic.twitter.com/7HyiIPWk1y
— DK Shivakumar (@DKShivakumar) November 21, 2025
सिद्धरामैया पद सोडणार?
काँग्रेसने 2023 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपद सिद्धरामैयांना दिले होते, तर डीके शिवकुमारांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. त्यावेळी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा झाली होती. काल(गुरुवारी) सिद्धरामैया यांना अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे, शिवकुमार गट मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर डीकेंचे निकटवर्तीय नेते दिल्लीला पोहोचले आहेत. आता काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरले.