Karnataka bypolls: कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता जाणार की राहणार? मतदार उद्या ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 20:59 IST2019-12-04T20:58:03+5:302019-12-04T20:59:02+5:30
कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती.

Karnataka bypolls: कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता जाणार की राहणार? मतदार उद्या ठरवणार
बंगळुरू : महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर काँग्रेस-जेडीएसचे कर्नाटकमधील सरकार पाडण्य़ात भाजपाला यश आले होते. मात्र, येडीयुराप्पांना मुख्यमंत्री पदासाठी मदत करणाऱ्या 15 जागांवर पोटनिवडणूक होणार असून भाजपाला सत्तेवर ठेवायचे की खाली खेचायचे याचा निर्णय उद्या मतदार घेणार आहेत.
कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. मात्र, संख्याबळ नसल्याने फडणवीसांसारखाच राजीनामाही देऊन टाकला होता. महत्वाचे म्हणजे भाजपा महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नंतर येडीयुराप्पांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 17 आमदारांना फोडले आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला. यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले आणि काँग्रेससोबतची आघाडीही तुटली.
यापैकी 15 जागांवर उद्या मतदान होत असून सत्ताधारी भाजपाविरोधात काँग्रेस आणि जेडीएस वेगवेगळे लढत आहेत. याचा फायदा भाजपाला होणार आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाच्या घाणेरड्या राजकारणामुळे जनता कंटाळली असून त्याचा फटका भाजपाला बसणार असल्याची टीका केली आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल 9 डिसेंबरला लागणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपा बहुमतात असून जर 15 पैकी किमान आठ जागा भाजपाला जिंकाव्या लागणार आहेत. असे न झाल्यास येडीयुराप्पांना पुन्हा सत्तेतून पायऊतार व्हावे लागणार आहे. सध्याच्या स्थितीला कर्नाटक हे भाजपाकडे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे.