'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:25 IST2025-11-26T17:24:23+5:302025-11-26T17:25:06+5:30
Karnatak Congress: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा तीव्र झाली आहे.

'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
Karnataka Congress: कर्नाटककाँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सिद्धरामैय्या यांच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे, डीके शिवकुमार मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हालचाली करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील डीके समर्थक आमदार दिल्लीवाऱ्या करत असून, काँग्रेस नेतृत्वाशी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा करत आहेत. अशातच, राहुल गांधी यांनी डीके शिवकुमार यांना थोडा धिर धरण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधींकडून शिवकुमारांना मेसेज
काँग्रेसचे वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार काही आठवड्यांपासून राहुल गांधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अखेर राहुल गांधींनी व्हॉट्सअॅपवर छोटासा मेसेज पाठवत प्रतिसाद दिला. “थोडी वाट पाहा, मी तुम्हाला फोन करतो,” असा राहुल गांधींनी मेसेज पाठवल्याची माहिती आहे. हा मेसेज सध्या सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेदरम्यान, महत्त्वाचा मानला जात आहे. शिवकुमार 29 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये येण्याची तयारी करत असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळही मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोनिया-राहुलशी चर्चा करुन निर्णय
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले की, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी चर्चा केल्याशिवाय कर्नाटक प्रकरणावर अंतिम निर्णय घेणार नाही. या वक्तव्यामुळे नेतृत्वबदलाबाबतचा निर्णय दिल्लीतील ‘हाय कमांड’कडेच राहणार असल्याचे संकेत अधिक दृढ झाले आहेत.
सिद्धारमैया गटाने चर्चा फेटाळून लावल्या...
सिद्धारमैया समर्थकांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांचा दावा आहे की, कोणताही औपचारिक अडीच वर्षांचा रोटेशनल करार झालेला नाही. सिद्धारमैया पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील.