४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:20 IST2025-05-15T12:18:48+5:302025-05-15T12:20:24+5:30
Anushka Tiwari : दोन इंजिनिअरच्या मृत्यूनंतर त्यांचे हेअर ट्रान्सप्लांट करणारी डॉ. अनुष्का तिवारीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

फोटो - आजतक
कानपूरमध्ये दोन इंजिनिअरच्या मृत्यूनंतर त्यांचे हेअर ट्रान्सप्लांट करणारी डॉ. अनुष्का तिवारीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ती स्वतःला हेअर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ असल्याचं सांगायची आणि कमी खर्चात केस येतील असा दावा करायची. इतर क्लिनिकमध्ये या सर्जरीसाठी लाखो रुपये खर्च येतो, परंतु डॉ. अनुष्का हे काम फक्त ४० ते ५० हजार रुपयांमध्ये करायची. मयंक कटियार आणि विनीत दुबे यांच्या कुटुंबीयांनी हा दावा केला आहे. मयंकच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉ. अनुष्का तिवारी हिने तिच्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन ४० हजार पाठवायला सांगितले आणि नंतर क्लिनिकमध्ये तब्बल ५ तास सर्जरी केली. तसेच तिने विनीतकडून सर्जरीसाठी रोख रक्कम घेतली होती.
मयंककडून घेतले ऑनलाईन पैसे
मयंकच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मयंक कल्याणपूरमधील इंदिरा नगर येथे त्याच्या आत्याच्या मुलीच्या घरी राहत होता. केस गळतीच्या समस्येमुळे त्याला हेअर ट्रान्सप्लांट करायचं होतं. त्याने ऑनलाईन सर्च केलं आणि केशवपुरम येथील एम्पायर क्लिनिकच्या डॉ. अनुष्का तिवारीशी संपर्क साधला. डॉक्टरांशी बोलल्यानंतर तो क्लिनिकमध्ये पोहोचला, जिथे तपासणीनंतर सर्जरीचा खर्च ४० हजार असल्याचं सांगण्यात आलं. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर डॉक्टरांनी ५ तासांची सर्जरी केली. नंतर मयंक पूर्णपणे निरोगी आहे आणि त्याला घरी नेता येईल असं सांगितलं.
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
कॉल डिस्कनेक्ट केला आणि सर्व नंबर केले ब्लॉक
घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच सर्जरी केलेल्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी फोटो आणि व्हिडिओ मागितले आणि काही औषधं लिहून दिली. पण तरीही वेदना कमी झाल्या नाहीत तेव्हा इंजेक्शन घेण्यास सांगण्यात आलं. त्याचाही काही फायदा झाला नाही. यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. तिथे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि काही वेळातच मयंकचा मृत्यू झाला. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांना फोन करून याबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला आणि सर्व नंबर ब्लॉक केले.
विनीतने दिले होते ५० हजार
विनीत दुबे यांच्या पत्नी जया त्रिपाठी म्हणाल्या की, डॉ. अनुष्का तिवारीने माझ्या पतीच्या अकाऊंटमधून ऑनलाईन १,००० रुपये एडव्हान्स म्हणून घेतले होते, तर ५० हजार रोख स्वरुपात त्यांना देण्यात आलं. तरीही योग्य उपचार मिळाले नाहीत आणि माझ्या पतीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दुसऱ्या नंबरवरून फोन केला आणि त्यांचं नाव न सांगता सांगितलं की पती आजारी आहेत आणि त्यांना अनुराग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा काका वेदप्रकाश त्रिपाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर त्यांना रिजन्सी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे विनीतचा मृत्यू झाला.