Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:06 IST2025-12-10T13:03:28+5:302025-12-10T13:06:11+5:30
Kangana Ranaut And Rahul Gandhi : मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा खासदार कंगना राणौत यांनी दौऱ्याबद्दल बोलताना राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी एसआयआर, मत चोरी आणि वंदे मातरमच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे अधिवेशनादरम्यान पाच दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर जात आहेत. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याच्या वेळेवरून भाजपा आक्रमक झाली आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा खासदार कंगना राणौत यांनी या दौऱ्याबद्दल बोलताना राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. " त्या व्यक्तीमध्ये (राहुल गांधी) कोणताही दम नाही, त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. बुधवारी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी जात असताना कंगना यांना राहुल गांधींच्या जर्मनी दौऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, "मी त्यांच्या दौऱ्याबद्दल काही वाचत नाही, कारण त्यांची बातमी नेहमीच निरुपयोगी असते."
#WATCH | दिल्ली: भाजपा सांसद कंगना रनौत ने लोकसभा में विपक्ष के नेता और कांग्रेस सांसद राहुल गांधी पर कहा, "...यह सबके लिए बहुत प्रत्यक्ष है कि क्यों उनकी पार्टी एकल अंक पर आ गई है, इस तरह के किरदार पर मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहती क्योंकि उस व्यक्ति में कोई दम नहीं है, चरित्र… pic.twitter.com/oZP4k64oEF
— ANI_HindiNews (@AHindinews) December 10, 2025
"मी त्यांच्या दौऱ्याबद्दल स्पष्टपणे काही बोलू शकत नाही, परंतु त्यांचा पक्ष सिंगल डिजिटवर का आला आहे, हे सर्वांसाठी अगदी स्पष्ट आहे. अशा व्यक्तिमत्त्वावर मी कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही, कारण त्या व्यक्तीमध्ये काहीच दम नाही, चारित्र्यात कोणतीही ताकद नाही, त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही" असंही कंगनाने म्हटलं आहे.
इंडियन ओव्हरसीज काँग्रेस या काँग्रेसच्या सेलने दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी १५ ते २० डिसेंबर या कालावधीत जर्मनीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते लोकांशी संवाद साधणार आहेत, तसेच जर्मन सरकारमधील काही मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. या दौऱ्यावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.