भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' ने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराचं राफेल पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांपर्यंत पोहोचलं आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या मदतीने दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कँप उद्ध्वस्त करण्यात आलं. याच दरम्यान हिमाचल प्रदेशातील मंडी येथील खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतने सैन्याच्या या यशस्वी कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक केलं आहे.
कंगना राणौतने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. "जितके संयमी, तितकेच धाडसी. जेव्हा आपण पंतप्रधानांच्या गुणांचा शोध घेतो तेव्हा ते आश्चर्यकारक असतं. अशा दिव्य गुणांनी सुसज्ज, अशा असंख्य गुणांनी समृद्ध, आपलं सर्वोच्च नेतृत्व किती पूजनीय आहे आणि आपण सर्वजण किती भाग्यवान आहोत" असं कंगनाने म्हटलं आहे.
कंगनाने पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. "नरेंद्र मोदीजी, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो आणि सूर्यासारखं तेजस्वी तुमचं चारित्र्य आणि विचारधारा नेहमीच मानवतेचं कल्याण आणि मार्गदर्शन करत राहो. जय हिंद" असं कंगना राणौतने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कंगनाने याआधीही भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली होती. तसेच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही शेअर केला होता. "ते म्हणाले की, हे मोदींना सांगा. आणि आता मोदींनी त्यांना दाखवून दिलं. ऑपरेशन सिंदूर" असं एका पोस्टमध्ये म्हटलं होतं. "जे आपलं रक्षण करतात, देव त्यांचं रक्षण करो. मी सैन्य दलाच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी शुभेच्छा देते. ऑपरेशन सिंदूर " असं दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.