हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात असल्याचा आणि संवेदनशील माहिती देण्याचा आरोप आहे. ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. "मला याबद्दल काहीही माहिती नाही. पोलीस खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत काय माहित?" असं म्हटलं आहे.
"जर माझी मुलगी पाकिस्तानला गेली असेल, तर तिला भारत सरकार किंवा प्रशासनाने काही कागदपत्र आणि पासपोर्ट दिला असेल. कोणीही अशा प्रकारे पाकिस्तानला जाऊ शकत नाही, ती त्यांच्या परवानगीनेच गेली असावी. माझी मुलगी चुकीची नाही. मला वाटतं की माझ्या मुलीला फसवलं जात आहे, पोलीस तिला अडकवत आहेत. तिच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत.
"भारतात राहून पाकिस्तानसाठी काम करणं हे शक्य नाही. माझ्या मते ही तिची चूक नाही, तिला सोडलं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे" असं ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. हरियाणा पोलिसांनी दावा केला होता की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोक युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या संपर्कात होते.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान ज्योती मल्होत्रा ही नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे.