ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 08:38 IST2025-05-22T08:36:21+5:302025-05-22T08:38:08+5:30
ज्योतीच्या कथित डायरीची जी पाने सार्वजनिकरित्या दाखवली जात आहेत ती पोलिसांच्या ताब्यात नाहीत. आरोपी ज्योतीच्या चार बँक खात्यांची चौकशी करण्यात आली आहे.

ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिसारच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची चौकशी पूर्ण झाली आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एनआयए, इंटेलिजेंस ब्युरो आणि मिलिटरी इंटेलिजेंसने ज्योती मल्होत्राची तिच्या पोलिस कोठडीत तीन दिवस चौकशी केली. यामध्ये सर्व एजन्सींनी त्यांचे अहवाल तयार केले आहेत. ती सध्या हिसार मध्यवर्ती कारागृहात आहे आणि आज दुपारी तिला न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, हिसार एसपींनी ज्योती मल्होत्रा हिच्याशी आतापर्यंत केलेल्या चौकशीची माहिती शेअर केली आहे.
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका?
हिसारचे एसपी शशांक कुमार सावन यांनी पत्रकारांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कोणताही थेट पुरावा अद्याप पोलिस तपासात सापडलेला नाही. ती निश्चितच पाकिस्तान ऑपरेटिव्ह एजन्सीशी संबंधित लोकांच्या संपर्कात होती. कोणत्याही दहशतवादी घटनांमध्ये तिचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. ज्योती सध्या हिसार पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला लष्करी किंवा संरक्षणाशी संबंधित कोणत्याही माहितीची उपलब्धता होती का, याबद्दलचे तथ्य अद्याप ज्ञात नाही. कोणत्याही पीओआयशी लग्न केल्याचा किंवा धर्मांतर केल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही.
बँक खात्यांची चौकशी केली
पोलिसांनी सांगितले की, ज्योती मल्होत्राचे तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी कुरुक्षेत्रातील रहिवासी हरकिरतलाही चौकशीसाठी बोलावले होते, त्याने व्हिसा दिला होता. हरकिरतचे दोन मोबाईल फोन चौकशीसाठी पाठवण्यात आले आहेत. विश्लेषणाचा निकाल अजूनही हिसार पोलिसांना देण्यात आलेला नाही. फॉरेन्सिक लॅबकडून मोबाईल आणि लॅपटॉपचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. सध्या व्हॉट्सअॅप चॅटबद्दल काहीही भाष्य करता येणार नाही. ज्योतीच्या कथित डायरीची जी पाने सार्वजनिकरित्या दाखवली जात आहेत ती पोलिसांच्या ताब्यात नाहीत. आरोपी ज्योती मल्होत्राच्या चार बँक खात्यांची चौकशी करण्यात आली आहे आणि सध्या या व्यवहारांबद्दल कोणतीही टिप्पणी करता येणार नाही.
एसपी म्हणाले,"मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक निराधार बातम्या सुरू आहेत. तथ्यहीन बातम्या केवळ तपासांवरच परिणाम करत नाहीत तर राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम करतात. हिसार एसपींनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या अनेक बातम्यांचे खंडन केले आहे. ज्योती मल्होत्राला कोणत्याही तपास संस्थेच्या ताब्यात देण्यात आलेले नाही, ती हिसार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि केंद्रीय संस्था वेळोवेळी तिची चौकशी करत आहेत. यावेळी पोलिसांनी माध्यमांना सुत्रांच्या हवाल्याने आणि कल्पनेवर आधारी बातम्या न करण्याची विनंती केली. प्रेसला दिलेल्या अधिकृत आणि तथ्यांवर आधारित विधानाच्या आधारे बातम्या प्रसारित कराव्यात, असंही म्हणाले.