नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल मनुभाई पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास न्या. पंचोली ऑक्टोबर २०३१ मध्ये सरन्यायाधीश होण्याच्या रांगेत येतील.
धारावी पुनर्विकास, मोतीलाल नगर पुनर्वaिकास, पीओपी गणेशमूर्ती, ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पासह अनेक सार्वजनिक प्रकल्प मार्गी लावणारे आणि कोल्हापूरला सर्किट बेंचला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव पाठवणारे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात बढतीसाठी शिफारस केली गेली आहे. सर्वोच न्यायालयात त्यांना चार वर्षांचा कार्यकाळ मिळेल.
१३ एप्रिल १९६४ रोजी जन्मलेले न्या. आराधे यांच्या गाठीशी तब्बल चार दशकांच्या वकिली कारकीर्दीचा अनुभव आहे. बी. एससी. आणि एलएल.बी. पदवी घेतल्यानंतर, त्यांनी १९८८ मध्ये जबलपूर येथील मध्य प्रदेश उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. नागरी, संवैधानिक, मध्यस्थी आणि कंपनी कायदा या क्षेत्रांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.
२००७ मध्ये त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी एमपी जैन आणि एस. एन जैन यांनी लिहिलेले ‘प्रिन्सिपल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ’ आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जी. पी सिंह यांनी लिहिलेल्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ स्टॅट्युटरी इंटरप्रिटेशन’ यांसारख्या सुप्रसिद्ध कायद्याच्या पुस्तकांचे अद्ययावतीकरण करण्याचे बहुमोल काम केले.
न्यायालयीन प्रवासन्या. आराधे यांचा २००९ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. २०११ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. पाच वर्षांनंतर, २०१६ मध्ये, त्यांची जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात बदली झाली. २०१८ मध्ये न्या. आराधे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात बदली झाली. २०२२ मध्ये त्यांनी काही काळ कर्नाटक उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. जुलै २०२३ मध्ये त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांची मुंबई उच्च न्यायालयत जानेवारी २०२५ मध्ये मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली.