"फरार नाहीत हेमंत सोरेन, ऑपरेशन लोटसपासून वाचवायचंय", झामुमोची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:58 AM2024-01-30T10:58:52+5:302024-01-30T11:01:17+5:30

hemant soren : मुख्यमंत्री लवकरच आपल्यात येणार असल्याचे मनोज पांडे यांनी सांगितले.

jmm says grand alliance mlas meeting in jharkhand cm hemant soren residence before ed enquiry  | "फरार नाहीत हेमंत सोरेन, ऑपरेशन लोटसपासून वाचवायचंय", झामुमोची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक!

"फरार नाहीत हेमंत सोरेन, ऑपरेशन लोटसपासून वाचवायचंय", झामुमोची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक!

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ईडीच्या चौकशीपूर्वी झारखंड मु्क्ती मोर्चाने (झामुमो) आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. झामुमोचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी ही माहिती दिली आहे. हेमंत सोरेन हे फरार नाहीत. मुख्यमंत्री लवकरच आपल्यात येणार आहेत. ते कुठे आहेत हे आम्ही सांगू शकत नाही. ही आमची रणनीती आहे. मात्र निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जात आहे, असे मनोज पांडे यांनी सांगितले. 

झामुमोच्या प्रवक्त्याने सांगितले की, पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. निवडून आलेल्या सरकारला ऑपरेशन लोटसपासून वाचवायचे आहे. झारखंडला वाचवायचे आहे. आदिवासी असणे हा गुन्हा आहे का? ते फरारी नाहीत. इतकी अस्वस्थता का आहे? हा आदिवासींचा अपमान आहे. हा संपूर्ण झारखंडचा अपमान आहे. मुख्यमंत्री लवकरच आपल्यात येणार असल्याचे मनोज पांडे यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांची ईडीच्या चौकशीपूर्वी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वत: या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला आमदार बॅग आणि सामान घेऊन उपस्थित राहू शकतात. 

महाआघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस आमदारांची बैठक 
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजल्यापासून काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे, तर महाआघाडीच्या सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पहाटे २:०० नंतर होणार आहे. महाआघाडीच्या बैठकीपूर्वी झारखंड प्रदेश काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच राहुल गांधी यांची झारखंडमध्ये होणारी भारत जोड न्याय यात्रा हा मुख्य अजेंडा असणार आहे. 

हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त
दरम्यान, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत.सोमवारी ईडीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे आणि हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. हेमंत सोरेन हे शनिवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. चार्टर्ड विमानाने ते पहाटे दिल्लीला पोहोचले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. तपास यंत्रणा चौकशीसाठी त्यांचा शोध घेत आहे. मात्र त्यांचे ठिकाण अद्याप कळू शकलेले नाही. 

Web Title: jmm says grand alliance mlas meeting in jharkhand cm hemant soren residence before ed enquiry 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.