Jitendra's honesty was appreciated, given back a farm land of 50 lakhs of rajasthan | जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं होतंय कौतुक, पठ्ठ्यानं 50 लाखांची शेतजमीन परत केली
जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं होतंय कौतुक, पठ्ठ्यानं 50 लाखांची शेतजमीन परत केली

शेतजमीन आणि संपत्तीसाठी सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्या घटना आपण नेहमीच पेपरात वाचतो. तर, बहिण-भावाच्या नात्यातही जमिनीच्या वादावरुन तंटा होतो. सध्याच्या काळात संपत्तीसाठी जवळच्या नात्यांमध्येही कटुता निर्माण झाली आहे. मात्र, मध्य प्रदेशमच्या बैतुल जिल्ह्यातील एका युवकाने प्रामाणिकपणाचे आदर्श घालून दिला आहे. जितेंद्र उर्फ जगदीश भारती असे या युवकाचे नाव असून तो पीडब्लूडी विभागात कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. 

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली, वयाच्या चौथ्या वर्षीच जितेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न गजपूर गावातील गंगा यादव हिच्याशी ठरवलं होतं. त्यावेळी, गंगाच्या कुटुंबीयांनी 10 एकर शेतजमिन जितेंद्रच्या नावे केली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांचा विवाह होऊ शकला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा तगादा लावला, तेव्हा जितेंद्र आपले शिक्षण पूर्ण करत होते. त्यामुळे जितेंद्र यांनी लग्नास नकार दिला. 

जितेंद्रने लग्नास नकार दिल्यानंतर गंगाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या कुटुंबातील मुलाशी लावून दिलं. तर, इकडे कालांतराने जितेंद्रचेही दुसऱ्या मुलीशी लग्न झाले. विशेष म्हणजे या घटनेत तब्बल 45 वर्षांनी जितेंद्र यांनी गंगाच्या भावाकडे संपूर्ण 10 एकर जमीन परत केली. रजिस्टार नोंदणी कार्यालयात सोमवारी दोन्ही कुटुंबातील सदस्य हजर होते. लहानपणी जितेंद्रच्या नावे करण्यात आलेल्या या 10 एकर जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे आज जवळपास 50 लाख रुपये एवढी आहे. मात्र, एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता जितेंद्रने 10 एकर जमिनी गंगाच्या कुटुंबीयांना परत दिली. जितेंद्रच्या या प्रामाणिपणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. 
 

Web Title: Jitendra's honesty was appreciated, given back a farm land of 50 lakhs of rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.