भीषण अपघात! LPG सिलेंडरने भरलेल्या ट्रकची बसला धडक; 15 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 15:47 IST2022-01-05T12:27:06+5:302022-01-05T15:47:22+5:30
Jharkhand Accident: बुधवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातात 20-25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भीषण अपघात! LPG सिलेंडरने भरलेल्या ट्रकची बसला धडक; 15 जणांचा मृत्यू
रांची:झारखंडच्या पाकूरमध्ये LPG सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला, तर 20-25 जण जखमी झाले आहेत. पाकूरच्या लिट्टीपाडा-आमदापारा मुख्य रस्त्यावर पडेरकोलाजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी 40 हून अधिक लोक प्रवास करत होते.
बसचा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बसचा पत्रा कापावा लागला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अपघातात जखमी झालेल्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सिलिंडरच्या ट्रक भरधाव वेगाने येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासन आणि पोलिसांचे पथक येण्यापूर्वीच मदत आणि बचावकार्य सुरू झाले होते. त्यानंतर लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम वेगात करण्यात आले. अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.