हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ दिवसांत सुटली; नवऱ्यासोबत आक्रित घडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:35 IST2024-12-24T16:34:13+5:302024-12-24T16:35:03+5:30
तरुण सकाळी दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोबाईलही बंद होता.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील झाशी येथे लग्नानंतर सात दिवसांनी रेल्वेची धडक बसल्याने वराचा मृत्यू झाला. झाशी-कानपूर रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस तपास करत आहेत. हा तरुण सकाळी दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोबाईलही बंद होता.
हे संपूर्ण प्रकरण झाशी जिल्ह्यातील भरोसा गावातील आहे, जिथे २१ वर्षीय शिवम अहिरवार हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची मोठी बहीण संगीता विवाहित आहे. वडील शेती करतात. तरुणाचे काका जयप्रकाश यांनी सांगितलं की, शिवम हा बलरामपूर येथे त्याच्या भावोजीच्या घरी राहत असताना पाणीपुरीचं काम करायचा.
११ डिसेंबर रोजी त्याचं लग्न दतिया येथील कालीपुरा गावात राहणाऱ्या काजलसोबत झाला होता. लग्नानंतर सून घरीच होती. घरात आनंदाचे वातावरण होतं. मात्र एक दिवस अचानक सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिवम दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद होता.
कुटुंबीयांना संशय आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. दुपारी रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो मृतदेह शिवमचा होता. याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. नवविवाहित वधू काजल बेशुद्ध पडली.
याप्रकरणी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गोपीनाथ सोनी यांनी सांगितलं की, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश यांच्याकडून माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. सध्या पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.