‘मेरे घर के आँगन में खेलने वाला कोई नहीं बचा’; झालावाड दुर्घटनेत मुले गमावली, आईचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 09:48 IST2025-07-27T09:47:12+5:302025-07-27T09:48:49+5:30

या घटनेत सहा वर्षांचा कान्हा आणि बारा वर्षांची मीना या दोघांना गमावलेल्या आईचा हा आक्रोश. 

jhalawar school collapse news mother cry children lost in tragedy | ‘मेरे घर के आँगन में खेलने वाला कोई नहीं बचा’; झालावाड दुर्घटनेत मुले गमावली, आईचा आक्रोश

‘मेरे घर के आँगन में खेलने वाला कोई नहीं बचा’; झालावाड दुर्घटनेत मुले गमावली, आईचा आक्रोश

झालावाड (राजस्थान) : ‘माझं सगळं लुटलं गेलं... माझी फक्त दोनच लेकरं होती. दोघंही गेली. माझं घर ओसाड झालं. माझ्या अंगणात खेळणारं कोणीच उरलं नाही. देवा, मला घेऊन गेला असतास तर बरं झालं असतं...’ राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी गावात शुक्रवारी पिपलोदी सरकारी शाळेची इमारत अचानक कोसळली. या घटनेत सहा वर्षांचा कान्हा आणि बारा वर्षांची मीना या दोघांना गमावलेल्या आईचा हा आक्रोश. 

झालावाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत सात मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सातही मुलांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबांना सुपुर्द करण्यात आले. एसआरजी रुग्णालयाबाहेर रडणारे, आक्रोश करणारे पालक आणि नातेवाईक असे हृदयद्रावक दृश्य होते. पाच मुलांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार झाले;  दोन मुलांचे अंत्यसंस्कार वेगवेगळे करण्यात आले. शनिवारी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न? 

घटनेनंतर काही पालकांनी शाळेतील शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. एका आईने विचारले, ‘मास्तर शाळेत गेले होते. तर मुलांना आत सोडून कसे दिले? ते बाहेर काय करत होते?’ या दुर्घटनेने ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या इमारतींच्या दुरवस्थेवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. 

पाच कर्मचारी निलंबित 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने शाळेच्या पाच कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. झालावाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.  

पोलिसांवर दगडफेक 

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गुराडी चौक आणि एसआरजी रुग्णालयाबाहेर रस्ता अडवून दुर्घटनेची  जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलन उग्र झाले आणि पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. यात एक पोलिस जखमी झाला असून आंदोलकांना पांगवण्यासाठी हलका लाठीमार करण्यात आला. 

 

Web Title: jhalawar school collapse news mother cry children lost in tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.