जया बच्चन म्हणाल्या, "भाजपच्या जखमी खासदारांना पुरस्कार दिला पाहिजे, कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 20:00 IST2024-12-21T19:57:21+5:302024-12-21T20:00:22+5:30
Jaya Bachchan: संसद धक्काबुक्की घटनेत भाजपचे दोन खासदार जखमी झाले होते. ते रुग्णालयात उपचार घेत असून, यावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चा यांनी खोचक टोला लगावला आहे.

जया बच्चन म्हणाल्या, "भाजपच्या जखमी खासदारांना पुरस्कार दिला पाहिजे, कारण..."
संसद परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आमने सामने आल्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी त्यांना पुरस्कार दिले पाहिजे, असे म्हटले आहे.
राज्यसभा खासदार जया बच्चन पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, "एक अभिनेत्री म्हणून काम करताना भाजप खासदार प्रताप सारंगी, मुकेश राजपूत आणि एस. फांगनोन कोन्याक यांच्यापेक्षा उत्कृष्ट कलाकार कधी बघितले नाही."
भाजपला लक्ष्य करत जया बच्चन म्हणाल्या, "सारंगीजी, नाटक करत आहेत. मी माझ्या अभिनय कारकीर्दीत राजपूतजी, सारंगीजी आणि नागालँडच्या महिला खासदाराच्या अभिनयापेक्षा उत्तम अभिनय कधीच बघितला नाही. अभिनय क्षेत्रातील सर्व पुरस्कार त्यांना दिले पाहिजेत."
"राजपूतजी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात होते. आधी एक छोटी पट्टी लावण्यात आली. नंतर एक मोठी पट्टी लावण्यात आली. त्यानंतर ते अतिदक्षता विभागातून त्यांच्या नेत्याशी बोलत होते. मी माझ्या आयुष्यात इतका उत्तम अभिनय कधीच बघितला नाही", अशा शब्दात जया बच्चन यांनी भाजप खासदारांवर टीकास्त्र डागलं.
संसद परिसरात अमित शाह यांच्या विधानाच्या निषेधात काँग्रेसने निदर्शने केली. तर भाजपसह सत्ताधारी खासदारांनी काँग्रेसविरोधात घोषणा दिल्या. दोन्हीकडचे खासदार आमने-सामने आले. त्यानंतर भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने पडलो आणि जखमी झाल्याचा आरोप केला.
त्याचबरोबर खासदार मुकेश राजपूत आणि महिला खासदार एस. फाँगनोन यांनीही विरोधकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता.