यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:50 IST2025-08-12T11:49:32+5:302025-08-12T11:50:07+5:30
Jammu-Kashmir: सरकारने १९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येचे खटले पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
Jammu-Kashmir: विशेष तपास संस्थेने (SIA) मंगळवारी श्रीनगरमधील ८ ठिकाणी छापे टाकले. १९९० मध्ये काश्मिरी पंडित सरला भट्ट यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल १९९० मध्ये झालेल्या या हत्येचा तपास करण्यासाठी SIA ने छापे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे छापे माजी JKLF प्रमुख यासीन मलिक याच्या घरासह अनेक माजी कमांडरांच्या लपण्याच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत.
यासीन मलिकच्या घरावर छापे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काश्मिरी पंडितांवर हल्ल्यांच्या अनेक घटना उघडकीस आल्या तेव्हाचे हे प्रकरण आहे. उपराज्यपालांनी काही काळापूर्वीच १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अनेक हत्यांचे खटले पुन्हा उघड करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार SIA ने ही कारवाई सुरू केली आहे. श्रीनगरमधील मैसुमा भागातील जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा माजी प्रमुख यासीन मलिक याच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात आले आहेत.
सरला भट्ट यांना निर्घृणपणे मारलेलं
नर्स म्हणून काम करणाऱ्या काश्मिरी पंडित सरला भट्ट यांचे शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वसतिगृहातून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला अपहरण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी श्रीनगरच्या सौरा भागात त्यांचा गोळ्यांनी चाळणी केलेला मृतदेह सापडला. हा खटला सुरुवातीला निगीन पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. नंतर एसआयएकडे वर्ग करण्यात आला.