रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:27 IST2025-08-30T17:25:55+5:302025-08-30T17:27:16+5:30
Jammu Kashmir Landslide: एकाच कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

File Photo
Jammu Kashmir Landslide: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील बदर गावात शनिवारी(दि.३०) सकाळी भूस्खलन झाले. या घटनेनंतर आतापर्यंत सात मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. येथे आणखी लोक अडकल्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत.
ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या मृतदेहांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या पाच मुलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. तर, तिकडे रामबनच्या राजगडमध्येही ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.
एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, मृतांमध्ये नजीर अहमद (३८), त्यांची पत्नी वजीरा बेगम (३५) आणि त्यांची मुले बिलाल अहमद (१३), मोहम्मद मुस्तफा (११), मोहम्मद आदिल (८), मोहम्मद मुबारक (६) आणि मोहम्मद वसीम (५) अशी आहेत.
दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस-प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले की, नजीर आणि त्यांचे कुटुंब सकाळी गाढ झोपेत होते, तेव्हा डोंगर उतारावर असलेले त्यांचे घर भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली आले आणि त्यात सर्वांचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये हाहाकार
गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जम्मू- काश्मीरमध्ये हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनामुळे लोक घाबरले आहेत. आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. नद्या तुडूंब भरुन वाहत असल्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देम्यात आला आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडून पॅकेजची मागणी केली
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला जम्मू आणि काश्मीरमधील आपत्ती लक्षात घेऊन मदत पॅकेज जाहीर करण्याचे आवाहन केले.