“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:01 IST2025-12-01T18:01:24+5:302025-12-01T18:01:50+5:30
Parliament Winter Session 2025: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या मित्रपक्षाने राहुल गांधी यांचे दावे खोडून काढत आमच्याकडे पूर्णपणे निष्पक्ष निवडणुका झाल्याचे म्हटले आहे.

“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
Parliament Winter Session 2025: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे निवडणुका, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना त्यांच्याच मित्र पक्षाने संसदेत घरचा अहेर देत आमच्याकडे ज्या निवडणुका झाल्या, त्या निष्पक्ष झाल्या, असे सांगितले.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि राज्यसभेचे खासदार चौधरी मोहम्मद रमजान यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पदाची शपथ घेतली. राज्यसभेत पहिल्यांदाच बोलताना मोहम्मद रमजान यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार भाजपा आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत आहेत. अशा स्थितीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी केलेले विधान राहुल गांधी यांचे दावे फेटाळणारे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्या सर्वांत निष्पक्ष निवडणुका होत्या
नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार चौधरी मोहम्मद रमजान यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, या ठिकाणी सर्वांनी म्हटले की, निवडणुका निष्पक्ष नव्हत्या. मला माझ्या राज्याबद्दल बोलायचे आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिथे निवडणुका झाल्या आणि त्या सर्वांत निष्पक्ष निवडणुका होत्या. निवडणुकांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. आमचे सहयोगी काँग्रेस सदस्य आणि अपक्ष आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये आमचे दोन तृतीयांश बहुमत असलेले सरकार आहे. दुसरीकडे, मोहम्मद रमजान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. जम्मू आणि काश्मीरमध्ये एक नवीन सरकार स्थापन झाले आहे, परंतु त्यांना स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. आमच्या सरकारला कोणताही अधिकार नाही; सर्व अधिकार उपराज्यपालांकडे आहेत आणि आदेश त्यांच्याकडूनच येतात, असे ते म्हणाले.
दरम्यान, अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यसभेच्या सदस्यांसाठी निवडणुका झाल्या आणि चार सदस्य निवडून आले. राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी सदस्यांना पदाची शपथ दिली. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्णन यांचा सभागृहात पहिला दिवस होता. सप्टेंबरमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुका झाल्या. यात सीपी राधाकृष्णन विजयी झाले.