जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 05:46 IST2025-09-03T05:46:26+5:302025-09-03T05:46:46+5:30
अमित शाह यांच्या जम्मू भेटीदरम्यान ही घटना घडली.

जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
मेढर/जम्मू: जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेंढर क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने सोमवारी उधळून लावला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू भेटीदरम्यान ही घटना घडली. गेल्या महिन्यातील मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे झालेली जीवितहानी आणि विध्वंस यांचा आढावा घेण्यासाठी ते जम्मू येथे आले होते. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉप्सने एक्स प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, सोमवारी पहाटे ५.३० वाजता लष्करी जवानांना बालाकोट
परिसरात नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाल दिसली. त्या रोखाने तत्काळ गोळीबार करून जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेमुळे लष्करी जवान अधिक सतर्क झाले असून दहशतवाद्यांच्या कारवायांचा कठोरपणे मुकाबला करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. लष्करी जवानांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली असता, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. बराच वेळ ही चकमक सुरू होती. बालाकोटजवळील डब्बी गावाच्या परिसरात ही घटना घडली. (वृत्तसंस्था)