बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:42 IST2025-10-15T11:42:13+5:302025-10-15T11:42:45+5:30
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली, ज्यामध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १६ जण गंभीर जखमी झाले.

बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली, ज्यामध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १६ जण गंभीर जखमी झाले. ५७ प्रवाशांना घेऊन जोधपूरला जाणारी बस जैसलमेर-जोधपूर महामार्गावर असताना ही दुर्घटना घडली. सेंट्रल एसी सिस्टममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. केके ट्रॅव्हल्सने ही नवी बस पाच दिवसांपूर्वीच खरेदी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बसला आग लागताच धुरामुळे बसचा दरवाजा लॉक झाला होता, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ते बाहेर पडू शकले नाहीत. जीव वाचवण्यासाठी काचा फोडून खिडकीतून उड्या मारल्या. सेत्रावा येथील लवारन गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांनी या अपघातात त्यांचं संपूर्ण कुटुंब गमावलं. महेंद्र मेघवाल, त्यांची पत्नी आणि तीन मुलांचा यामध्ये मृत्यू झाला.
घटनास्थळी पोहोचलेल्या थईयात गावातील रहिवासी कस्तूर सिंह यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, लोकांनी काचा फोडल्या आणि मदत मागितली. खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. अपघातादरम्यान अग्निशमन दल बराच वेळ पोहोचलं नाही. शेवटी लष्कराने बसचे दरवाजा तोडून लोकांना वाचवण्यासाठी जेसीबीचा वापर केला. कस्तुर सिंह यांनी दावा केला की बसमधून फक्त १६ जणांना वाचवण्यात आलं.
महेंद्र जैसलमेरमध्ये काम करत होता आणि शहरातील इंदिरा कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. तो दिवाळीसाठी त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्याच्या गावी जात होता. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीररित्या भाजले आहेत. बसमधील मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. जळालेल्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांचा मृतदेह कुटुंबियांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे.