दोनदा दारू पिऊन १००च्या स्पीडने चालवला डंपर; १३ बळी, १७ वाहने चक्काचूर, आरोपीची धक्कादायक कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:00 IST2025-11-05T13:59:14+5:302025-11-05T14:00:05+5:30
जयपुरमध्ये झालेल्या भीषण अपघातातील आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे.

दोनदा दारू पिऊन १००च्या स्पीडने चालवला डंपर; १३ बळी, १७ वाहने चक्काचूर, आरोपीची धक्कादायक कबुली
Jaipur Accident: जयपूरजवळ हरमाडा येथे झालेल्या थरारक आणि अत्यंत भीषण अपघातामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका डंपर चालकाने १७ हून अधिक वाहनांना धडक देत, रस्त्यावर हाहाकार माजवला. यात १३ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पोलिसांनी आरोपी डंपर चालक कल्याण मीना याला मंगळवारी अटक केली असून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी कल्याण मीनाने अनेक धक्कादायक खुलासे केले.
कल्याण मीना याने अपघात होण्यापूर्वी सोमवारी दोनदा दारू प्यायल्याची कबुली दिली. पहिल्यांदा सकाळी घरातून निघाल्यावर आणि परत येताना बेनार रोडजवळ त्याने पुन्हा दारू प्यायली होती. नशेमध्ये असतानाच, एका कार चालकाने त्याला रस्त्यावर निष्काळजीपणे गाडी चालवण्याबद्दल हटकले होते. यामुळे संतप्त झालेल्या मीनाने डंपरला रॉंग साइडने आणि भरधाव वेगात पळवायला सुरुवात केली. नशेच्या आणि रागाच्या भरात असलेल्या मीनाला त्याने किती लोकांना चिरडले याचा अंदाजही आला नाही.
भरधाव वेगात असलेल्या ट्रकने वाहनांना इतक्या जोरदार धडक दिली की अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर जवळपास १.५ किलोमीटरच्या रस्त्यावर चेंदामेंदा झालेल्या गाड्या, दुचाकी आणि मृतदेह विखुरलेले होते. पोलीस आणि वैद्यकीय अहवालांनी मीनाने दारूचे सेवन केल्याची पुष्टी केली. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो इतका मद्यधुंद होता की त्याला काहीच आठवत नव्हते, फक्त त्याचा पाय अॅक्सिलरेटरवर होता आणि तो डंपर चालवत होता.
सुरुवातीला मृतांची संख्या १४ असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अंतिम मृतांची संख्या १३ आहे. दुसऱ्या एका अपघातातील जखमी व्यक्तीला चुकून हरमाडा अपघाताच्या मृतांच्या आकडेवारीत समाविष्ट केल्यामुळे हा गोंधळ झाला होता. सर्व १३ मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
या भीषण दुर्घटनेनंतर पोलीस आयुक्त सचिन मित्तल यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली. त्यांनी वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. आरटीओने आरोपी कल्याण मीना याचा ड्रायव्हिंग परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ट्रक कंपनीच्या व्यवस्थापनालाही नोटीस बजावली आहे.
दरम्यान, अपघातातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये डंपर जवळजवळ १०० किलोमीटर प्रति तास वेगाने एकामागून एक वाहनांना चिरडत असल्याचे दिसून आले आहे.