...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:54 IST2025-11-04T10:53:29+5:302025-11-04T10:54:13+5:30
Jaipur Dumper Accident News: एका मद्यधुंद डंपरचालकाने रस्त्यावर बेदरकारपणे डंपर चालवत पाच कारना धडक दिल्याची आणि सुमारे ५० जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना काल राजस्थानमधील जयपूर येथे घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
एका मद्यधुंद डंपरचालकाने रस्त्यावर बेदरकारपणे डंपर चालवत पाच कारना धडक दिल्याची आणि सुमारे ५० जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना काल राजस्थानमधील जयपूर येथे घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता या डंपरचालकाने हा अपघात का घडवून आणला, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून, त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी डंपरचालकाची एका कारचालकासोबत वादावादी झाली होती. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या वादाने काही मिनिटांतच अनेक घरातील कर्त्या माणसांना हिरावून घेतले. आरोपी डंपरचालक वाद झाल्यानंतर रागाच्या भरात कारवर ट्रक चढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सुदैवाने सदर कारचालकाने शिताफीने आपली कार बाजूला घेतली आणि आपला जीव वाचवला.
या घटनेबाबत माहिती देताना एसीपी उषा यादव यांनी सांगितले की, अपघाताच्या काही वेळ आधी आरोपी डंपर चालकाचा एका कारचालकासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर कारचालक कारमधून खाली उतरून डंपरचालकाला चार शब्द सुनावले होते. त्यामुळे संतापलेल्या डंपर चालकाने त्याच्या कारला हळूहळू धडका देत धमकवायला सुरुवात केली. मात्र कारचालकाने वेळीच आपली कार बाजूला घेतली. त्यानंतर डंपरचालक तिथून पसार झाला होता.
या घटनेनंतर काही मिनिटांनी सोमवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास हा डंपरचालक रस्त्यातील कारचालक आणि इतरांवर काळ बनून तुटून पडला. त्याने लोहामंडी पेट्रोलपंपाकडच्या रोड क्रमांक-१४ वरून महामार्गावर येताना अनेक गाड्यांना धडक दिली. तसेच अनेकांना चिरडले. त्यानंतर लोकांनी आरोपी डंपरचालक कल्याण मीणा याला पकडून बेदम मारहाण केली. यादरम्यान, डंपरचालक मद्यधुंदावस्थेत होता. आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.