जयपूर विमानतळावर मोठा अपघात टळला! एअर इंडियाच्या विमानाचा रनवेला स्पर्श होताच पुन्हा उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:32 IST2026-01-28T15:31:27+5:302026-01-28T15:32:39+5:30
Jaipur Airport Air India landing fail

जयपूर विमानतळावर मोठा अपघात टळला! एअर इंडियाच्या विमानाचा रनवेला स्पर्श होताच पुन्हा उड्डाण
जयपूर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने देशभरात खळबळ उडालेली असताना जयपूर विमानतळावर आणखी एक विमान अपघात होता होता वाचला आहे. दिल्लीहून जयपूरला येत असलेल्या एअर इंडियाच्या AI-1719 या विमानाचे लँडिंग करताना मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
दुपारी १:०५ च्या सुमारास हे विमान जयपूर विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. लँडिंगसाठी चाके जमिनीला टेकली, मात्र धावपट्टीवर विमानाचा समतोल बिघडल्याचे किंवा 'अस्थिर अप्रोच' असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. सुरक्षित लँडिंग शक्य नसल्याचे पाहून वैमानिकाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने विमानाचा वेग वाढवला आणि ते पुन्हा हवेत झेपावले.
महत्त्वाचे प्रवासी आणि दहशतीचे वातावरण
या विमानात काँग्रेसचे राजस्थान प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासह अनेक प्रवासी होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमानात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमान पुन्हा हवेत गेल्यानंतर सुमारे १० मिनिटे आकाशात घिरट्या घालत राहिले. परिस्थिती सामान्य झाल्यावर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
सुरक्षा नियमांचे पालन
विमानतळ सूत्रांच्या माहितीनुसार, अशा प्रकारची 'गो-अराउंड' प्रक्रिया ही सुरक्षिततेचाच एक भाग असते. जर लँडिंगच्या वेळी काहीही धोका वाटला, तर विमान पुन्हा हवेत घेऊन पुन्हा प्रयत्न करणे हे वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा भाग आहे.