उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:46 IST2025-11-22T13:44:01+5:302025-11-22T13:46:08+5:30
Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांनी भोपाळमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामधून उपस्थितांना पहिल्यांदाच संबोधित केले. यावेळी जगदीप धनखड यांनी काही सूचक विधानं केली. त्यांच्या भाषणातील प्रत्येत शब्दाचा एक विशिष्ट्य अर्थ होता. तसेच या भाषणादरम्यान, अनेकदा धनखड याच्या विधानांना उपस्थित श्रोत्यांनी हसून दाद दिली.

उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावर्षी जुलै महिन्यात नाट्यमय घडामोडींनंतर उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बरेच दिवस ते सार्वजनिक जीवनापासून अलिप्त होते. दरम्यान, जगदीप धनखड यांनी भोपाळमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामधून उपस्थितांना पहिल्यांदाच संबोधित केले. यावेळी जगदीप धनखड यांनी काही सूचक विधानं केली. त्यांच्या भाषणातील प्रत्येत शब्दाचा एक विशिष्ट्य अर्थ होता. तसेच या भाषणादरम्यान, अनेकदा धनखड याच्या विधानांना उपस्थित श्रोत्यांनी हसून दाद दिली.
जगदीप धनखड हे संघाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन वैद्य यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी बोलण्यास सुरुवात केल्यावर धनखड यांनी माणूस कुणीच नसतो, तो घडतो, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आपण अशा जमान्यात जगत आहोत जिथे तिथे तुम्ही कितीही नाकारलं तरी समजूतच खूप काही निश्चित करत आहे. या वक्तव्यांमधून जगदीप धनखड हे मनमोहन वैद्य यांचं कौतुक करत होते, मात्र ते स्वत:बाबत संदेश देताहेत की काय असं वाटत होतं.
यावेळी धनखड यांनी उपस्थितांना इंग्रजीमधून संबोधित केले. ते म्हणाले की, खूप विचारविनिमय केल्यानंतर मी आज इंग्रजीमधून बोलायचं ठरवलं आहे. त्याला एक कारण आहे. जिथून आव्हान येतंय, जे समजू शकत नाहीत. जे समजू इच्छित नाहीत, ज्यांना कुठल्याही परिस्थितीत आमची प्रतिष्ठा धुळीस मिळवायची आहे, त्यांना मी त्यांच्या खास भाषेत बोलत नाही तोपर्यंत मी काय म्हणतोय ते कळणार नाही.
यादरम्यान, बोलताना जगदीप धनखड यांनी इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा उल्लेख केला. देव करो आणि कुणी नरेटिव्हच्या फेऱ्यात अडकू नये. या चक्रव्युहात कुणी अडकला तर त्यातून बाहेर येणं कठीण आहे. मी केवळ आपलं उदाहरण देत नाही आहे, जयदीप धनखड यांनी असं म्हणताच लोक खो खो हसू लागले. धनख़ड हे बोलत असताना मंचावर मागून एक व्यक्ती आली आणि त्याने एक चिठ्ठी पोडियमवर ठेवली. ही चिठ्ठी पाहून धनखड म्हणाले की, सूचना आली आहे, वेळेची मर्यादा आहे. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले आणि किती वेळ आहे असं विचारलं. विमान पकडण्याच्या चिंतेमुळे मी माझं कर्तव्य सोडू शकत नाही. माझा हल्लीचा भूतकाळ त्याचं उदाहरण आहे, धनखड यांचं हे विधान ऐकताच लोकांना हसू आवरलं नाही.