जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:58 IST2025-07-22T11:57:40+5:302025-07-22T11:58:39+5:30

Jagdeep Dhankhar: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Jagdeep Dhankhar: Jagdeep Dhankhar commented on his retirement 11 days ago; now his sudden resignation has sparked discussions | जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?

जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?

Jagdeep Dhankhar: संसदेचे पावसाळी अधिवेशन काल(दि.21) सुरू झाले अन् पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात धनखड म्हणाले की, मी उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात आरोग्याचे कारण समोर केले आहे.  धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ मध्ये पूर्ण होणार होता, मात्र त्यांनी २ वर्षे आधीच राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अकरा दिवसांपूर्वी सांगितला रिटायरमेंट प्लॅन
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात आपला रिटायरमेंट प्लॅन सांगितला होता. त्यावेळी त्यांनी २०२७ मध्ये निवृत्त होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता अचानक त्यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राजीनामा पत्रात त्यांनी प्रकृतीचे कारण दिले असले तरी, विरोधक वेगळाच संशय व्यक्त करत आहेत. 

अशी झाली होती धनखड यांची निवड
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली होती. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनखड यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनखड यांना एकूण ७२५ पैकी ५२८ मते मिळाली, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली. त्यांनीतर धनखड यांनी १० ऑगस्ट रोजी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. 

११ दिवसांत मूड कसा बदलला?
जगदीप धनखड ११ दिवसांपूर्वी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याबद्दल बोलत होते. १० जुलै रोजी जगदीप धनखड दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या दरम्यान त्यांनी म्हटले होते की, 'जर देवाने मला आशीर्वाद दिला, तर मी ऑगस्ट २०२७ मध्ये निवृत्त होईन.' म्हणजेच, धनखड यांना आपला कार्यकाळ पूर्ण करायचा होता, मात्र आता त्यांनी अचानक आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. 

कार्यकाळ पूर्ण न करणारे तिसरे उपराष्ट्रपती 
जगदीप धनखर यांच्यापूर्वी आणखी दोन उपराष्ट्रपती होते, जे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कृष्णकांत यांनी २१ ऑगस्ट १९९७ रोजी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली, परंतु २७ जुलै २००२ रोजी त्यांचे निधन झाले. याशिवाय, १९६९ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी उपराष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी राजीनामा दिला होता. 

Web Title: Jagdeep Dhankhar: Jagdeep Dhankhar commented on his retirement 11 days ago; now his sudden resignation has sparked discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.