"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:47 IST2025-11-19T19:45:24+5:302025-11-19T19:47:22+5:30
Prashant Kishor Latest News: तीन-साडेतीन वर्ष बिहारमध्ये काम करत असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदाच मनमोकळे बोलले. आपण दिवसभर मौनव्रत पाळणार असल्याचेही ते म्हणाले.

"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
"बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल माझ्यासाठी खूपच निराशाजनक राहिला आहे. जेव्हापासून निवडणुकीचे निकाल आले आहेत, तेव्हापासून मला झोपच येत नाहीये. आम्ही बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न बघत होतो, पण आम्हाला शून्य जागा मिळाल्या", असे सांगत जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी त्यांच्या मनातील खंद व्यक्त केली.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "जेडीयू २५ पेक्षा जास्त जागा जिंकेल अशा परिस्थितीत नव्हती. इतक्याच जागा यायला हव्या होत्या. पण, त्यांना ८०-८२ जागा मिळाल्या आहेत. आता लोक म्हणत आहेत की, हा निकाल वेगळा वाटत आहे. पण, या विधानसभा निवडणुकीकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितले, तर त्यात सर्वात मोठा फॅक्टर होता, तो म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० ते १२५ कोटी रुपये रोख रक्कम जनतेला दिली जाने. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० ते ६५ हजार व्यक्तींना थेट १० हजार रुपये देऊन सरकारने मते खरेदी केली."
आमचे मुद्दे लोकांना ऐकायलाच छान वाटले -प्रशांत किशोर
"आम्हाला फक्त तीन टक्के मते मिळाली आहेत. जन सुराज्य पक्षाला जनतेने सांगितले की, आता सराव करा. आम्ही सध्या स्पर्धेत नाही आहोत. जेव्हा तुम्हाला ३ ते ४ टक्के मते मिळतात, तेव्हा तुम्ही मूळापासून सुरूवात करता. दारु बंदी हटवण्याच्या मुद्द्यामुळे आम्ही पराभूत झालो नाहीये. माझे मुद्दे लोकांना फक्त ऐकायलाच छान वाटले. जी व्यवस्था ४० वर्षात बनली आहे, तिला एका झटक्यात बदलू शकत नाही", असे प्रशांत किशोर म्हणाले.
स्वतः निवडणूक न लढणे चूक होती का?
विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर उतरले नाही. त्यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यावर भर दिला. स्वतः निवडणुकीत न उतरणे चूक होती का? असे जेव्हा विचारण्यात आले. त्यावर प्रशांत किशोर म्हणाले, "जर मला आधीच माहीत आहे की, मी हरणार आहे, तर मी माझ्या सर्व काही, पैसे, वेळ आणि ताकद का जुगारात लावेल. "
"आमदारच व्हायचं असतं, तर मी खासदार बनलो असतो. मला माहिती असते तर मी इतका मोठा धोका का पत्करला असता? मी कधीही कोणताही सर्व्हे केला नाही. मी याला अदृश्यच ठेवले. पण, मला स्वतःला आशा होती की, कमीत कमी १२ ते १५ टक्के मते मिळतील. पण, तीन टक्केच मते मिळाली. मी गांधी आश्रमामध्ये आता एक दिवस मौनव्रत पाळणार आहे आणि महात्मा गांधींकडून प्रेरणा घेणार आहे. पुढे जाणार आहे", असे प्रशांत किशोर म्हणाले.