तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं, विमान बिघाडावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच केले भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:43 IST2018-04-29T16:43:04+5:302018-04-29T16:43:04+5:30
निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमानात झालेल्या संशयास्पद बिघाडादरम्यान आलेला अनुभव राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला. त्यावेळी ते म्हणाले...

तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं, विमान बिघाडावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच केले भाष्य
नवी दिल्ली - दोन तीन दिवसांपूर्वी आम्ही कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला. मला वाटलं सगळं संपलं. पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमानात झालेल्या संशयास्पद बिघाडादरम्यान आलेला अनुभव आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला.
काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेल्या जनआक्रोष मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. यावेळीच त्यांनी आपल्या विमानात संशयास्पदपणे झालेल्या बिघाडाचाही उल्लेख केला. खरंतर राहुल गांधी आपले भाषण पूर्ण करून जागेवर बसले होते. मात्र काही वेळातच ते पुन्हा उभे राहिले. त्यावेळी ते म्हणाले, " तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. मला तुम्हाला एका गोष्ट सांगायची आहे. खरंतर ही गोष्ट सांगायची नव्हती, पण मग विचार केला तुम्ही आपलीच माणसं आहात. म्हणून सांगतो. तुम्हा माहीतच असेल दोन तीन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला होता. मला वाटलं सगळं संपलं. पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला. आता कर्नाटकचा निकाल 12 मे रोजी आहे. त्यानंतर पुढचे 10-15 दिवस तुम्ही मला सुट्टी द्या. म्हणजे मी कैलास आणि मानसरोवराची तीर्थ यात्रा करून येईन."
दरम्यान, आज झालेल्या जनआक्रोष सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. डोकलाम, शेतकऱ्यांचं कर्ज, भ्रष्टाचार, न्यायालयातील 4 न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद या मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधलं. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागतो. मात्र तरीही मोदी मूग मिळून गप्प बसतात, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका करत 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल फुंकलं. भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, बँक घोटाळे, राफेल करार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी शांत का बसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीला ते संबोधित करत होते. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ही राहुल यांची दिल्लीतील पहिलीच रॅली होती. कर्नाटकची निवडणूक जवळ आली असताना राहुल गांधींनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'आतापासून येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस जिंकेल आणि 2019 मध्ये ताकद दाखवून देईल,' असं राहुल यांनी म्हटलं.