तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:44 IST2025-11-26T12:44:30+5:302025-11-26T12:44:53+5:30
संशोधनात, मुले, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तिन्ही वयोगटांवर याचा परिणाम जवळपास सारखाच आढळला

तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक
नवी दिल्ली : तुम्ही दररोज तासभर ‘रील’ स्क्रोल करता आणि त्यानंतर तुमचा मेंदू सुस्त, जड किंवा अस्वस्थ वाटतो का? नव्या या अभ्यासानुसार, सतत रील किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहणे लक्ष, स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य कमकुवत करते. जेवढे जास्त आपण स्क्रोल करतो, तेवढीच आपल्या मेंदूची खोलवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. सायकोलॉजिक बुलेटिनच्या अभ्यासानुसार, रील मेंदूत जलद, नवीन आणि त्वरित आनंद देणाऱ्या उत्तेजनांचा पूर आणतात.
एक स्क्रोल अन् एक ‘किक’
प्रत्येक वेळी आपण स्क्रोल करतो, तेव्हा एक छोटी ‘डोपामाईन किक’ मिळते. डोपामाईन हे तेच रसायन आहे जे आपल्याला चांगले वाटेल असे काम वारंवार करण्यास प्रवृत्त करते. या छोट्या-छोट्या आनंदाच्या लाटांनंतर, मेंदू तितक्याच वेगाने खाली येतो. आणि हेच तीव्रतेने खाली येणे थकवा, सुस्ती, मानसिक ताण निर्माण करतो.
बस एक व्हिडीओ आणखी
संशोधनात, मुले, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तिन्ही वयोगटांवर याचा परिणाम जवळपास सारखाच आढळला. याचा अर्थ, ही ‘जेन-झी’ची समस्या नसून, ती प्रत्येक वयोगटातील समस्या आहे. सर्वाधिक नुकसान अशा लोकांमध्ये नोंदवले गेले जे स्वतःला प्रत्येक वेळी म्हणतात, ‘बस एक व्हिडीओ आणखी...’ आणि यात कित्येक तास जातात. यात लोक इच्छा असूनही स्क्रोल करणे थांबवू शकत नाहीत. हे धोकादायक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
...तर लगेच ‘ब्रेक’ घ्या
अहवालानुसार, जास्त वेळ मोबाइलची स्क्रीन स्क्रोल करत राहणे झोपेची गुणवत्ता, मूड आणि मानसिक स्पष्टता बिघडविते. कमी झोप, चिंता आणि तणाव पुढे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक कमकुवत करतात. तज्ज्ञांनुसार, जर तुम्हाला खालील गोष्टी जाणवत असतील, तर हा तुमच्या मेंदूचा स्पष्ट संकेत आहे की आता थोडी विश्रांती आवश्यक आहे: लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत घट, चिडचिडेपणा, स्क्रोल करणे थांबवण्यात अडचण, झोप अनियमित होणे.